उमरगा / प्रतिनिधी-

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे येणेगुर, कसगी येथील गुरांचे बाजार पूर्णपणे बंद आहेत. बैलजोडी खरेदी-विक्री बंद असल्याने सहा महिन्यांत लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे बैलांकरवी होणा-या शेतीच्या मशागती अभावी शेतकरी चिंतेत सापडला आहे.

ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे गतिमान झाली, यात शंका नाही. मात्र, अजूनही शेतीच्या ब-याच कामांना बैलजोडीशिवाय पर्याय नाही हे वास्तव आहे. खरीप हंगामात शेतीची तयारी करीत असताना सरी पाडणे, वखरवाहीसाठी बैलजोडीला प्राधान्य दिले जाते. त्याच बरोबर गावांत शेतरस्ते नाहीत. तेथे शेतमाल वाहतुकीसाठी तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांना बैलजोडी महत्त्वाची असते.  त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव साठ हजारांपासून दिड लाखांपर्यंत असतात. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. बैलजोडी खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.

ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा अधिक शिरकाव झाला असुन शेतकरी रब्बी पेरणीच्या तयारीत लागला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरची मागणी अचानक वाढली आहे. त्यात वखरणी, नांगरणीचे भावही वाढले आहेत. त्यामुळे बैलजोडीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मात्र बाजार लॉकडाऊन झाल्यामुळे बैलांचे खरदी-विक्री व्यवहार थांबलेले आहेत. दरम्यान पुण्या-मुंबईहून परतलेले पारंपारिक शेतीकडे वळले आहेत. लॉकडाऊनच्या काळात गुरांच्या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. गर्दी होईल. त्यामुळे शासनादेशाने बाजार बंद आहे. दुसरीकडे शेतक-यांना बैलजोडी आवश्यक आहे. बैलजोड्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावणा-या दलालांना बाजार बंद असल्याने हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यांचा रोजगार बुडाला आहे. करोनाचे संकट दूर होऊन बाजार सुरू व्हावा, अशी मनोमन प्रार्थना करीत आहेत.

 
Top