तालुक्यातील खंडेश्वर मध्यम प्रकल्प यंदा पुर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र प्रकल्पाच्या मातीच्या भरावास लांबलचक भेगा स्वरुपाचे भगदाड पडल्याची धक्कादायक बाब दि.२७ सोमवार रोजी समोर आली होती.यामुळे धरणाखालील तीन चार गावाला याचा धोका निर्माण होऊ शकतो याची गांभीर्याने दक्षता घेत संबंधित विभागाने अखेर मंगळवारी दि.२९ रोजी प्रकल्पाचा सांडवा फोडुन पाणी सोडले आहे.
आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी तहसीलदार व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या.याची दखल घेत दुसऱ्याच दिवशी मंगळवार रोजी तहसीलदार अनिलकुमार हेळकर आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांडव्याची भिंत फोडुन पाणी सोडले. त्यामुळे मध्यम प्रकल्प फुटीचा व परिसरातील गावांचा होणारा मोठा धोका टळला आहे.
तालुक्यातील खंडेश्वरी मध्यम प्रकल्प गेल्या चार वर्षानंतर पुर्ण क्षमतेने भरला आहे.मात्र काही लोकांनी प्रकल्पाच्या सांडव्यात अतिक्रमण केल्याने व प्रकल्प परिसरात विहीरीचे खोद काम करित असताना ब्लास्टींगचा वापर केल्याने आवाजामुळे प्रकल्पाच्या माती भिंतीला मोठ्या स्वरूपाच्या भेगा पडल्याचे कांही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दोषी असल्याचा आरोप ही शेतकऱ्यांनी केला आहे.
प्रकल्पातील सांडवा फोडून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांच्या,शेतजमीनीचे नुकसान झाले असल्याने त्याचे तातकाळ पंचनामे करून शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्यात यावी आशी मागणी शेतकऱ्यातुन होत आहे.