उस्मानाबाद/प्रतिनिधी
 जिल्हाभरात मागील दोन दिवसांपासून अवैध दारूविक्रीविरोधात सुरू करण्यात आलेली विशेष कारवाईची माेहीम शुक्रवारी (दि.७) तिसऱ्या दिवशीही सुरूच होती. तिसऱ्या दिवशी विविध ११ ठिकाणी कारवाया करून पोलिसांनी तब्बल ५,२५० लिटर गावठी दारू बनविण्याचे रसायन नष्ट करत देशी दारूच्या ३३१ बाटल्य जप्त केल्या.
पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात अवैध दारूविक्रीविरोधात तीन दिवसांपासून विशेष माेहिमेंतर्गत कारवाया करण्यात येत आहेत. यामध्ये शुक्रवारी आकरा ठिकाणी केलेल्या कारवायामध्ये २ लाख ३७ हजार ६५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये शिराढोण येथे तिघांविरोधात कारवाई करून दारू बनविण्याचे १०५० लिटर रसायन व ३० लीटर गावठी दारू जप्त करत नमुने घेऊन हा माल नष्ट करण्यात आला.
ढोकी पोलिसांनी विजयकुमार झाडके, शिवराज धर्मराज देशमुख (दोघे रा. खंडाळा, ता. लातुर) यांना कोल्हेगाव फाटा येथे कारमधून (क्र.एमएच १२ सीडी ७३१९) चोरट्या मार्गाने नेण्यात येणाऱ्या देशी दारुच्या ३१७ बाटल्या जप्त केल्या. उमरगा तालुक्यातील पळसगाव तांडा येथेही मोठी कारवाई करण्यात येऊन अबु पोमा राठोड, किरण रतन चव्हाण,मोहन रामा चव्हाण, गोपीनाथ रुपला राठोड यांना ताब्यात घेत २१ बॅरेल दारू बनविण्याचे रसायन, १०० लिटर गावठी दारू असा एकूण १ लाख ७१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
 
Top