काटी / प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रतिष्ठित नागरिक फत्तेसिंह शहाजीराव देशमुख वय (90) यांचे रविवार दि. 30 रोजी सकाळी साडेसात वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
पत्नी सौजन्यादेवी यांच्या  निधनानंतर अवघ्या सातव्या दिवशी पतीचेही निधन झाल्याची दुर्दैवी घटना तुळजापूर तालुक्यातील काटी  येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेने त्यांचे चिरंजीव भारतीय जनता पक्षाचे नेते तथा सोसायटीचे विद्यमान चेअरमन विक्रमसिंह देशमुख व  त्यांच्या परिवारावर आईच्या निधनाच्या दु:खातून सावरतो न सावरतो तोच रविवारी वडिलांचेही छत्र हरपल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पत्नी पाठोपाठ पतीने या जगाचा निरोप घेतला व सात जन्म सोबत राहण्याची शपथ पूर्ण केली. मात्र त्यांच्या या निधनाने विक्रमसिंह देशमुख व त्यांच्या परिवारावर मात्र अचानक आई-वडिलांचे छत्र नाहीसे झाल्यामुळे अशा या सुखी कुटुंबाला काळाची दृष्ट लागली असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. काटी येथील कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्र्वभूमीवर व शनिवारी घेतलेल्या रॅपिड अॅंन्टीजेन टेस्ट मध्ये सातजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने  खबरदारी व  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मयताच्या पार्थिवावर तुळजापूर येथील नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांमार्फत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत येथील देशमुख स्मशानभूमित दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे काटी येथे हळहळ व्यक्त होत आहे.
 
Top