*जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी
*जिल्ह्यात शासकीय व खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णासाठी ३ हजार ६८९  खाटांची उपलब्धता
*लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील सर्व  लाभार्थ्यांना ५० हजार मे. टन गहू व तांदूळ या अन्नधान्याचे वितरण
*उस्मानाबाद ची प्रयोगशाळा ही लोकसहभागातून स्थापन होणारी राज्यातील  एकमेव प्रयोगशाळा
*जिल्हयातील 12 शिवभोजन  केंद्रामार्फत 1 लाख 66 हजार थाळयांचे वितरण
*महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील 64 हजार 500 शेतकऱ्यांना 477 कोटींचा लाभ.
*पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
 उस्मानाबाद / प्रतिनिधी-
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने व राज्याने सामाजीक,शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली आहे. सर्व सामान्य नागरिकांसह समाजातील मागासवर्गीय व दुर्बल  घटकांतील व्यक्तींची उन्नती व्हावी, त्यांची आर्थिक प्रगती वेगाने होऊन ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल व्हावेत.  म्हणून आपले शासन त्यांच्यासाठी विकासाच्या अनेक योजना कार्यक्षमपणे राबवित असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव  गडाख यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 वा वर्धापन समारंभ प्रसंगी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमराजे निबांळकर,आमदार कैलास घाडगे-पाटील,जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशिला देशमुख,उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,तहसिलदार गणेश माळी, जि.प.उपाध्यक्षधनजंय सावंत,महिला बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे, कृषी सभापती दत्ता साळुके, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदिसह इतर मान्यवर उपस्थित होते.
 पुढे बोलताना पालकमंत्री गडाख म्हणाले की, संपूर्ण जगात कोविड-19 विषाणूने थैमान घातले आहे. आपला देश व संपूर्ण राज्यात कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू ठेवलेली आहे. आपल्या जिल्ह्यात सर्व यंत्रणा कोरोना चा प्रतिबंध करण्यासाठी अहोरात्र झटत असल्याचे सांगून या सर्व कोरोना योद्धांना त्यांनी  शुभेच्छा दिल्या.
 तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय व त्याअंतर्गत चे उपजिल्हा रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या कोविड-19 रुग्णालयात येणाऱ्या संशयित रुग्णांच्या स्वॅबच्या तपासणी  पूर्वी पुणे, सोलापूर, लातूर व आंबेजोगाई येथील प्रयोगशाळेत करण्यात येत होती. परंतु जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उस्मानाबाद जिल्हावासियांनी एक कोटीपेक्षा अधिक रक्कम उभा करून लोकसहभागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्राच्या परिसरात नवीन साथरोग प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली व ही राज्यातील लोकसहभागातून स्थापन होणारी एकमेव प्रयोगशाळा आहे. व या प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने केले. या प्रयोगशाळेत दोन सत्रात स्वॅब तपासणी करण्यात येत असून दररोज 184 स्वॅबची तपासणी येथे केली जात असत्याचे पालक मंत्री गडाख यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णासाठी 3789 खाटांची व्यवस्था उपलब्ध करून ठेवली असून यातील 548 खाटांना ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध असून 108 खाटांना वेंटीलेटर ची सुविधा उपलब्ध  असल्याचे पालकमंत्री गडाख यांनी सांगून लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जिल्हयातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व एपीएल शेतकरी योजना अशा सर्व  लाभार्थ्यांना 50 हजार मे. टन गहू व तांदूळ या अन्नधान्याचे वितरण करण्यात आले असून जिल्हयातील 12 शिवभोजन  केंद्रामार्फत 1 लाख 66 हजार थाळयांचे वितरण झाले आहे.तसेच जिल्हयातील 45000 गरजू कुंटूबांना मोफत धान्य कीट व 4000 दुर्धर आजारग्रस्त व्यक्तिंना मोफत औषधांचे कीट देणगीदार व स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती  योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 71 हजार शेतकरी पात्र असून 67 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे. यापैकी 64 हजार 500 शेतकऱ्यांना 477 कोटी लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर  हस्तांतरित झालेली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सन 2019-20 मध्ये नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या 56 हजार शेतकऱ्यांना सहा कोटी रक्कमेचा लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले तर  कृषी यांत्रिकरण उप अभियान योजनेअंतर्गत खुल्या बाजारातून कृषी अवजारे व यंत्र खरेदी केलेल्या 407 लाभार्थी शेतकऱ्यांना 3 कोटीचा निधी अनुदान म्हणून वितरित केलेला आहे, असे श्री. गडाख यांनी सांगितले.
राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण या योजनांमधून 1 हजार लाभार्थी शेतकऱ्यांना 4 कोटी रक्कमेचे अनुदान वितरित झाले असून प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019- 20 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाच लाख 76 हजार हेक्टरवरील पिकांचा बेचाळीस कोटीचा शेतकरी हिस्सा विमा हप्ता भरलेला होता. त्या मोबदल्यात 80 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना 572 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली असल्याचे श्री गडाख यांनीी सांगितले.
 जिल्ह्यात सीएसआर च्या माध्यमातून सन 2019- 20 मध्ये 16 प्रकल्पाकरिता 13 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे.  या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या 53 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर 93 विधवा महिला लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन गाई व 600 अंगणवाड्यांना एलपीजी गॅस कनेक्शन ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून याअंतर्गत विविध प्रकारच्या 13 प्रकल्पांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झालेली आहे, अशी माहिती श्री. गडाख यांनी दिली.
विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा  जिल्हा सामाजीक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतीक क्षेत्रात चांगली  प्रगती  करीत आहे. ही  अत्यंत समाधानाची बाब असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी  ग्वाही  पालकमंत्री गडाख  यांनी या  प्रसंगी  दिली. व यावेळी ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी, तसेच घरी बसून  स्वातंत्र्यदिन साजरा करणारे स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोक प्रतिनिधी, विद्यार्थी, पालक,पत्रकार आणि बंधु भगिनीं  यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या. प्रारंभी पालकमंत्री गडाख यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृती स्थळाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान यावेळी पालकमंत्रयांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबददल राष्ट्रपती पदक व पोलीस महासंचालक पद प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये पोलीस निरीक्षक दगुभाई महोम्मद शेख तर सपोनि श्रीनिवास संभाजी घुगे,सपोनि प्रदीप महादेवराव जाधव, पोलीस हवालदार सुनिल अमृतराव कोळेकर,आत्माराम उत्तमराव जाधव, सुकुमार गणपत बनसोडे, पोना रामेश्वर बाबुराव उंबरे, स्टेनो प्रल्हाद आनंदा ऐनवाड यांचा सत्कार करण्यात आला.
 
Top