उस्मानाबाद/प्रतिनिधी
 जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते केमिस्ट बांधव या कोरोना काळात अहोरात्र आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे त्यांना सदरील रोगाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता आहे. या सर्व सभासद केमिस्ट बांधव व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी औषधी भवन येथे स्वतंत्र क्वाॅरंटाइन सेंटर औषधी विक्रेता संघटना स्वच्छेने सुरू करण्यास तयार असून याकरीता आवश्यक ते सहकार्य करण्याची मागणी संघटनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, या कोरोनाच्या प्रादूर्भावाच्या परिस्थितीत औषध विक्रेता कायम कार्यतत्पर आहे. यातून त्यांच्यासह कुटुंबीयांना कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे विक्रेत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे ही संघटनेची नैतिक जवाबदारी आहे. या लढ्यात आता प्रशासन, वैद्यकीय विभाग या बरोबरच सर्व सामाजिक व व्यापारी संघटनांनी देखील आपापल्या परीने सहभाग घेणे गरजेचे झाले आहे. वरील कारणास्तव आम्हाला औषधी भवन येथे फक्त संघटनेच्या सभासदांकारीता क्वाॅरंटाईन सेंटर सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात क्वाॅरंटाईन सेंटर सुरु केल्यास कमीत कमी ३० बेडची व्यवस्था होऊ शकते. यासाठी लागणारा सर्व खर्च संघटना व सभासद स्वेच्छेने करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील केमिस्ट सभासदांनी क्वॉरंटाईन सेंटरसाठी काहीही माहिती लागल्यास अध्यक्ष धनाजी आनंदे यांच्याकडे संपर्क करावा असेही आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी उपक्रम स्तुत्य असून जिल्ह्यातील सर्व संघटनांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
x

 
Top