उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोरोना या महामारीने जगभर थैमान घातलेले असताना उस्मानाबाद जिल्ह्यातही दररोज दीडशे ते दोनशे रूग्ण वाढत आहेत. रुग्णसंख्येत वाढ होत असताना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या सुविधेत प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. रुग्णांवर वेळेवर उपचार करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असल्याने काही रुग्णांचे उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरसह जिल्ह्यातील सर्व ठिकाणी डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत तसेच धक्कादायक बाब म्हणजे कोविड सेंटर किंवा कोरोनो संशयितांना क्वॉरंटाइन केलेल्या ठिकाणी देण्यात येणारे दोनवेळचे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे, अशा तक्रारी आहेत. संशयितांना किंवा कोरोना रुग्णांना सकस आहार मिळावा, अशी शासनाची अपेक्षा आहे. वास्तविक पाहता या जेवणाचे एका वेळचे दर ४० रुपये तर नाश्त्याचे दर २० रुपये एवढे आहेत. ४० रुपयांमध्ये जेवणात चपाती, सुकी भाजी, डाळ व भात, असा मेन्यू आहे. मात्र, इतक्या कमी खर्चात सकस आणि प्रोटिनयुक्त जेवण कसे मिळणार, हा प्रश्नच आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांना दर्जेदार भोजन द्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराच संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.
सर्वसाधारणपणे हॉटेलमध्ये ४० रुपयांत पोटभर नाश्ताही मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे जेवण रुग्णांच्या माथी मारले जात असल्याचा किळसवाणा प्रकार सुरू आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांना तसेच क्वॉरंटाईनमधील संशयितांना सकाळच्या नाश्त्यामध्ये मागणीनुसार ध, केळी, अंडी आदी प्रकारचे सकस आणि पौष्टिक खाद्य देण्यात येत आहे. तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात वेगवेगळे पौष्टिक पदार्थ दिले जातात. एका वेळच्या थाळीवर १०० रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला जातो. विशेष म्हणजे शासनाने जेवणाचे दर आणि मेन्यू ठरविण्याचे अधिकार स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेले असताना सकस आहारापासून रुग्णांना वंचित ठेवण्याचा दुर्दैवी प्रकार घडत आहे.
त्यामुळे रुग्णांना तसेच क्वॉरंटाइनमधील संशयितांना दर्जेदार आहार द्यावा, मागणीनुसार दूध, अंडी, केळी आदी पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करावा, अन्यथा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.