उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी गणेशोत्सव काळात मिरवणूकीस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी सोमवारी (दि. 17) आयोजित पत्रकार परिषदेत केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत त्यांनी माहिती दिली.
पुढे बोलताना राजतिलक रौशन म्हणाले, सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव येत आहे. या काळात भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं खबरदारी म्हणून गणेशोत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव साधे पणाने साजरा करावा, याबाबत गणेश मंडळाच्या घेण्यात आलेल्या बैठकीत मंडळांना कायद्यांबाबत माहिती देवून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहेे. या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील 32 गणेश मंडळानी यावर्षी गणेशोत्सव साजरा न करण्याचे सांगितले आहे. त्यात आनखी मंडळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील 105 गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्येही आनखी गावांच्या संख्येची वाढ होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव काळात मंडळाकडून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र यावर्षी कोरोनामुळे ही होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन झाले पाहिजे. त्यामुळे गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा, गर्दी टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैणात करण्यात येणार आहे. तसेच सुचनांचे पालन न केल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी गणेश मंडळांनी गर्दी टाळण्यासाठी आदेशाचे पालन करावे, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल. सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्ती स्थापन करताना तिची उंची ही 4 फुटापेक्षा जास्त असू नये, तर घरातील मुर्ती ही केवळ 2 फूट उंचीची असावी, याची घबरदारी घ्यावी. गणेश मुर्ती स्थापन केली, त्याठिकाणी सोशल डिस्टसिंग असावे, गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी, मिरवणूक काढण्यात येवू नये, आदी सुचनाही त्यांनी यावेळी केल्या आहेत.