कलंब / प्रतिनिधी-
राज्यातील जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या आँफलाईन ऐवजी आँनलाईन पद्धतीनेच कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या कडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहीती शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे दिली आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.१५ जुलै रोजी आदेश काढुन राज्यातील जिल्हापरिषद शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या बदल्या दि.२७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार ३१ जुलै पुर्वी आँफलाईन पद्धतीने कराव्यात असे निर्देश दिले आहेत पण आँफलाईन पद्धतीने बदल्या केल्यास  त्यात मानवी हस्तक्षेप होऊन गैरप्रकार होऊ शकतात तसेच भ्रष्टमार्गाचा अवलंब ही होऊ शकतो त्या मुळे शिक्षकांच्या बदल्या या आँनलाईन पद्धतीनेच होणे गरजेचे आहे.
तसेच आँनलाईन बदल्या करत असताना सन २०१८ व २०१९ च्या बदल्या मध्ये रेण्डम राऊंड मध्ये व विस्थापित बदल्यामध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांना ऑनलाईन बदल्यात विना अट प्राधान्याने बदलीची तरतूद असावी. तसेच महिला शिक्षकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. राज्य शासनाने फेब्रुवारी २०२० मध्ये राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणावर पुनर्विचार करून निर्णय घेण्यासाठी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती, या समितीने राज्य स्तरावर आणि विभागीय स्तरावर शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा केली होती या चर्चेत  राज्यातल्या सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या सर्व प्रतिनिधीनी जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच कराव्यात अशी एकमुखी मागणी केलेली होती त्या समितीच्या अहवाला नुसार नवीन  बदली धोरण जाहीर करून बदल्या करणे अपेक्षित असताना सध्या कोविड-१९ चा संसर्ग वाढलेला असताना ऑफलाईन बदल्या करण्याचा घाट घालणे चुकीचे आहे.
२७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणातील त्रुटी दूर करून ऑनलाइन पद्धतीनेच बदल्या करण्यात याव्यात असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने दि.१६ जुलै रोजी ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांना पाठवलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस अप्पासाहेब कुल, कोषाध्यक्ष जनार्धन निऊंगरे,एन वाय पाटील, विनोद राऊत, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अनुराधा तकटे यांच्या सह्या  आहेत.
 
Top