उमरगा/माधव सुर्यवंशी :
उमरगा तालुक्यात आज एकाच दिवशी आठ तर नऊ दिवसांत ३० रूग्ण पॉझिटिव्ह आल्याने उमरगेकरांना धक्का बसला आहे. नागरीकांची गर्दी, व्यापा-यांची बेफिकिरी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोनाचा विळखा वाढतो आहे. शहरातील दोन खाजगी रुग्णालयातील कर्मचारीच कोरोनाबाधित आढळल्याने शहरातील तीन रुग्णालये सिल करण्यात आली आहेत तर अनेक रुग्णांलये अघोषित बंद आहेत.
कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसागणिक वाढत आहे. कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपाय योजना केल्या जात आहेत. नागरीकांना वारंवार सूचनाही देण्यात येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. नागरीकांचा हलगर्जीपणा व बेफिकिरीमुळे धोका वाढताना  दिसतो आहे. कुणीही गाफील न राहता घरात थांबणे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे आहे. नेहमीप्रमाणे घरात थांबणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे महत्वाचे आहे. तरच आपला परीसर, गाव व तालुका कोरोनामुक्त राहील. अन्यथा एखादयाच्या हलगर्जीपणामुळे सगळ्या कष्टावर पाणी फेरले जाईल ही भिती खरी होताना दिसते आहे. उमरगा शहरात २७ जूनला एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर त्यापाठोपाठ त्याचे दोन नातेवाईक पॉझिटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या तीन डॉक्टर्ससह दहा कर्मचाऱ्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याव्यतिरिक्त एका राष्ट्रीयकृत बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या पतीसह कर्मचाऱ्यांचे स्वॅब पाठविण्यात आले होते, त्यात पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर इतर कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. महिलेचा पतीही शहरातील दुसऱ्या शाखेत वरिष्ठ पदावर आहे. तर एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पाच तर दुसऱ्या एका रुग्णालयातील एक असे सहा कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रविवारी उमरगा शहर २, गुंजोटी ३ व नागराळ ३ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत असतानाच गुंजोटी, नागराळ, एकोंडी व तुरोरी येथील रुग्णांची भर पडल्याने गेल्या नऊ दिवसांत तब्बल ३० रूग्ण पॉझिटिव्ह आल्याने उमरगेकरांना धक्का बसला आहे.

 
Top