उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 बोर्डा  (ता. कळंब) येथील पोस्टमनने ठेवीदारांच्या ठेवीवरच डल्ला मारला असून लाखो रुपयांचा अपहार केल्याची ओरड ठेवीदारांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे पोस्टातील सुकन्या योजनेचे अनेकांचे पैसेही हडप केल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे.
पोस्ट ऑफीस हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हक्काचे अन भरवशाचे आर्थिक उलाढालीचे साधन म्हणून ओळखले जाते. अनेक नागरिकांना राष्ट्रीयकृत बँकेत, सहकारी, खासगी बँकेत अपेक्षित सेवा मिळत नाही. असे नागरिक सध्या पोस्टातील बँकींग व्यवहाराला आपलेसे करतात. मात्र पोस्ट कार्याच्या या विश्वासाहर्तेला तडा देण्याचे काम बोर्डा येथील पोस्टमनने केले आहे.
काही नागरिकांनी ठेवी ठेवल्या आहेत. त्यांच्या पासबुकला एन्टी करून पैसे भरल्याचा बनाव त्याने केला आहे. प्रत्यक्षात ऑनलाईनला संबंधीत ग्राहकाच्या खात्यावर ठेवलेली रक्कम नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पोस्ट ऑफीसच्या अंतर्गत बोर्डा, शेळका-धानोरा आणि खेर्डा अशी तीन गावे येतात. या तिन्ही गावातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या पोस्ट ऑफीसमध्ये पैसे ठेवले आहेत.तसेच केंद्र शासनाच्या सुकन्या योजनेत मुलींच्या नावाने अनेकांनी प्रत्येक वर्षी ठेवीची रक्कम जमा केली जाते. काही नागरिकांनी स्वतःच्या मुलींच्या नावे रक्कम जमा केल्याचे पासबुकला दिसत आहे. प्रत्यक्षात खात्यावर रक्कम दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या पैशाबाबत यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 माझ्या मुलीच्या नावाने प्रत्येक वर्षाला ठराविक रक्कम पोस्टात भरतोत. आतापर्यंत मी २५ हजार रुपयांची रक्कम भरली आहे. तशी नोंदही पासबुकला आहे. प्रत्यक्षात खात्यावर केवळ सात हजार रुपये असल्याचे पोस्ट खात्यातील अधिकारी सांगत आहेत.
 
Top