उस्मानाबाद  / प्रतिनिधी-
पोलिस उपनिरीक्षक मर्यादित स्पर्धा परीक्षा २०१६ मध्ये गुणवत्ता यादीतील उर्वरित १२८५ पास व पात्र उमेदवार राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णया अभावी चार वर्षापासून पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत शासन व राज्यपालांचे लक्ष वेधण्यासाठी पोलिस बाॅईज असोसिएशनच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातून राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा परीक्षेत अंतिम टप्प्यात गुणवत्ता सिद्ध केलेल्या २९१३ उमेदवारांची यादी आयाेगाकडून ५ मे २०१७ रोजी जाहीर करण्यात आली. या गुणवत्ता यादीतील २९१३ पैकी १६२८ उमेदवारांना शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन पोलिस उपनिरीक्षक पदावर सामावून घेतले. परंतु, या यादीतील १२८५ उमेदवार सामावून घेण्याबाबत अद्याप धोरणात्मक निर्णय झालेला नाही. राज्याचा सुधारीत आकृतीबंध पाहता पोलिस उपनिरीक्षक पदाची १५ हजारावर पदे रीक्त आहेत. सदरील पात्र उमेदवार हे मागील दहा ते पंधरा वर्षापासून पोलिस खात्यातच सेवेत असून सध्याची परिस्थिती पाहता त्यांना प्रशिक्षणासाठी न पाठविता थेट प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पोलिस बाॅईज असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यातून शासन व राज्यपालांना निवेदन देण्यात येत आहे.
 
Top