तुळजापूर / प्रतिनिधी-
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बुधवारी (दि.२२) ते रविवारी (दि. २६) या कालावधीत तुळजापूर नगर पालिका हद्दीत जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. या कालावधीत भाजी, किराणा, कृषी सेवा केंद्र आदी अत्यावश्यक सेवांसोबतच सर्व बॅँका, शासकीय कार्यालये बंद असणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले आहे.
तुळजापूर शहरालगत सोलापूर, लातूर या जिल्ह्यासह उस्मानाबाद शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तुळजापूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जनता कर्फ्यूची गरज व्यक्त होत होती. जनता कर्फ्यूच्या कडकडीत अंमलबजावणीसाठी शहरातील सर्व बॅँका, शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. या संदर्भात तहसील कार्यालयात आयोजित शहरातील सर्व बॅँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वांनी सहकार्य करण्याचे आश्वासन बॅँक अधिकाऱ्यांनी दिले.
 जनता कर्फ्यूच्या कालावधीत नगरपालिका हद्दीतील भाजीपाला, किराणा दुकाने, कृषी सेवा केंद्र आदी अत्यावश्यक सेवा बंद असणार आहेत. दुध केवळ सकाळी ६ ते ९ या कालावधीत तर केवळ दवाखान्याजवळील मेडिकल दुकाने सुरू राहतील. केवळ शासकीय वाहने आणि अत्यावश्यक सेवांसाठी पेट्रोल पंप सुरु राहतील.
 
Top