उस्मानाबाद/प्रतिनिधी
पाणी, स्वच्छता व अन्य सोयीबद्दल क्वाॅरंटाईन केंद्राच्या संदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. प्रत्यक्ष भेट देऊन केंद्रांची पाहणी करण्यात येणार आहे. अशा समस्या दिसून आल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तसेच केंद्रप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली.
जिल्ह्यातील क्वारंटाइन सेंटरवरील विविध समस्या खासदार राजेनिंबाळकर यांच्याकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने तत्काळ दखल घेऊन   कोरोना सेंटर वरती उपाययोजना करण्यासंदर्भात सर्व संबंधित अधिकारी व केंद्रप्रमुख यांची आढावा बैठक खासदारांनी शिंगोली (उस्मानाबाद) येथील शासकीय विश्रामगृहात घेतली. यावेळी आमदार कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात कोरोना सेंटर तयार करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात कोरोना सेंटरवरती संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी. तसेच दररोज सेंन्टरवर पिण्याचे पाणी, अंघोळीसाठी गरम पाणी, उत्कृष्ट नाश्ता, पोटभर जेवण देण्यात यावे, सर्व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. सेंटरवर आलेल्या रुग्णांची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशा सूचना खासदार राजेनिंबाळकर यांनी दिली. याची सर्वस्वी जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांची राहील. जिल्ह्यातील कुठल्याही सेंटरवर अचानक भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे. सूचनांचे पालन केलेले आढळून न आल्यास संबंधित तहसीलदार, केंद्रप्रमुख जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबी बैठकीत खासदारांनी दिली. यावेळी तुळजापूर व उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, कळंब व वाशीच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ , भूम व परंड च्या उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर, केंद्रप्रमुख उपस्थित होते.
 
Top