उस्मानाबाद/प्रतिनिधी - पाकिस्तानातील प्रेयसीला भेटण्यासाठी निघालेल्या उस्मानाबाद येथील झिशान सिद्दकी या प्रेमविराला भारत - पाकिस्तान सिमेवरील कच्छ येथे बीएसएफच्या जवानांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यास कच्छ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. दरम्यान झिशान सिद्दकीला तेथील कोर्टाने जामीन दिला असून त्याला उस्मानाबाद येथे आणून त्याच्या कुटूंबियाकडे सोडण्यात आल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी दिली.
 उस्मानाबाद शहरातील ख्वाजा नगर येथील 20 वर्षीय तरुण झिशान सिद्दकीचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाकिस्तानातील तरुणीशी प्रेम जुळले होते. त्यामुळे झिशान हा सदरील प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानला निघाला होता. मात्र या दरम्यान त्याच्या घरच्यांनी झिशान हरवल्याची तक्रार दिनांक 11 जुलै रोजी उस्मानाबाद शहर पोलिसांत दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे धाराशिव शहर पोलिसांनी तपास केला असता तो पाकिस्तानातील मुलीच्या प्रेमात असून तिला भेटण्यासाठी पाकिस्तानला जाणार असल्याचेही पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी झिशानच्या मोबाईलचे लोकेशन चेक केले असता ते गुजरातमधील कच्छ येथे आढळून आले होते. धाराशिव पोलिसांनी याबाबत तात्काळ कच्छ पोलिसांना माहिती दिली होती. परंतू दिनांक 16 जुलै रोजी कच्छ येथील भारत - पाक सिमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी त्यास त्याब्यात घेतले. झिशान सिद्दकीने धाराशिव ते अहमदनगर हा प्रवास पायी तर अहमदनगर ते कच्छ पर्यंतचा प्रवार हा मोटारसायकलवर केला होता.
बीएसएफच्या वतीने झिशान सिद्दकी यास कच्छ पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. कच्छ पोलिसांच्या वतीने झिशान सिद्दकीवर विविध कलमानुसार तसेच सध्या कोरोना लॉकडाऊनच्या काळात प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर तेथील कोर्टाने 27 रोजी झिशान सिद्दकी यास जामीन दिला. त्यानंतर उस्मानाबाद पोलिसांच्या वतीने त्यास ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर त्याची चौकशी करुन अखेर आज सकाळी त्यास त्यांच्या कुटूंबियाकडे सुपूर्द करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी दिली.
 
Top