उमरगा/ प्रतिनिधी
उमरगा लोहारा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मागील काही दिवस जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व बाजारपेठ बंद आहे. यामुळे रविवारपासून बाजारपेठ सुरू करता येईल किंवा कसे याबाबत आज प्रशासन व व्यापारी यांच्यात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय बैठक पार पडली.
बैठकीस आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरणजी गायकवाड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, उमरगा पालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, नायब तहसीलदार रोहन काळे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, व्यापारी महासंघाचे सीद्रामप्पा चिंचोळे, हरिप्रसाद चांडक, रणधीर पवार, यांसह व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर बैठकीत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत रविवारपासून सर्व बाजारपेठ सकाळी 9 ते 5 या वेळेत सुरू करण्याचे ठरले. हॉटेल व्यवसायिकांनी स्वच्छता पाळून हॉटेलमध्ये एक वेळा वापरण्याजोगे ग्लास वापरावेत अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्यापारी बांधवांनी दिलेल्या वेळेतच दुकाने चालू ठेवावीत तसेच ग्राहकांनीही सामाजिक आंतर राखत मास्कचा नियमित वापर करावा, नगरपालिकेने जनजागृती साठी नियमित शहरातून लाऊडस्पीकरद्वारे सूचना कराव्यात, तसेच भाजीपाला विक्रेत्यासाठी नगरपालिकेने तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी असे   सांगितले. 
उमरगा तालुक्यासाठी कोरोना तपासणी मर्यादा 20 करण्यात आल्याने प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या होत्या.  या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मा.आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य उपसंचालक एकनाथ माले, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याशी सम्पर्क साधून तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली, यानुसार नमुना तपासणीची मर्यादा 20 वरून 35 करण्यात आली असून लातूर येथील लॅबमध्ये दररोज 20 नमुने तर उर्वरित 15 नमुने अंबाजोगाई येथे तपासले जाणार आहेत.  तसेच थोड्याच दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोरोना तपासणी लॅब सुरू होणार असल्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी सांगितले.  येत्या काळात रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास बाजारपेठ सुरू करण्याबाबत वेगळा विचार करण्यात येईल असे यावेळी ठरले.

 
Top