उस्मानाबाद/प्रतिनिधी :
कोरोना बाधित रूग्णांवर उस्मानाबाद शासकीय रूग्णालयात योग्य उपचार होत असून आपण स्वत: रात्री भेट देऊन डॉक्टर जागेवर आहेत का ? हे पाहिले आहे. इतर रूग्णांना भेटून त्याच्याकडून ही माहिती घेतली. परंडा तालुक्यातील रमजान पटेल या रूग्णांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यांनी व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये ऑक्सीजन रात्री बंद केल्याचे सांगितले आहे . ऑक्सीजन लाईन सेंट्रल लाईन असल्यामुळे रात्रीच्या वेळी ऑक्सिजन लाईन बंद केली असती तर इतर रूग्णांनाही  त्याचा त्रास झाला असता. व्हायरल झालेला  व्हिडिओ हा दुर्दैवी आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
जिल्हयातील परंडा तालुक्यातील आसू गावच्या रमजान पटेल या कोरोना बाधित रूग्णाचा रविवारी मृत्यू झाला होता. यानंतर शासकीय रूग्णालय व डॉक्टरांवर विविध आरोप करण्यात आले होते. जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी मंगळवार दि. ७ जुलै रोजी तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेस जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, डॉ.धनंजय पाटील, डॉ.प्रवीण डुमणे उपस्थित होते.
पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी सांगितले की,उस्मानाबाद शासकीय रूग्णालयात सर्व स्टाफ प्रशिक्षीत असून रूग्णांनी घाबरण्याचे कारण नाही, कोरोना झाल्याचे समजताच रूग्णांना धक्का बसून घाबरून मृत्यू पावल्याचे कांही उदाहरणे आहेत. परंतू कोरोना बाधित रूग्णांनी चांगला प्रतिसाद दिल्यास १० दिवसात दुरूस्त होऊ शकतो त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे सांगितले. एका प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना या प्रकरणात शो कॉज नोटीस दिली असून खुलासा मागविण्यात आल्याचे ही सांगितले.  डॉ. गलांडे यांनी माहिती देताना सांगितले की, रूग्णालयात रूग्णांवर करण्यात आलेल्या उपचाराबाबत पुर्ण माहिती जिल्हा टास्क फोर्सला  दिली जाते.विशेष म्हणजे कोरोना बाधित रूग्ण दगावू नये म्हणून राज्यातील  टास्क फोर्सचे सुफर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतो आणि रूग्णांचा प्राण वाचविण्याचा  प्रयत्न करतो. जिल्हयात सध्या ४ गंभीर रूग्ण असून ७ रूग्णांवर यशस्वी उपचार चालू असल्याचे ही सांगितले.
दोन्ही फुप्फूस निकामी
३८ वर्षीय रूग्ण पटेल हे बार्शी येथील खासगी रूग्णांलयातून येथे उपचारासाठी २७ जून रोजी परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना उस्मानाबाद शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले. गेल्या ८ दिवसापासून त्यांना खोकला व ताप होता. तरी सुध्दा गाईडलाईन प्रमाणे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याच्या दोन्ही फुप्फूसाला संसर्ग झाला होता. जेवण करताना अथवा बाथरूमला जाताना ऑक्सिजन ते काढून ठेवत असल्यामुळे त्यांना नंतर अधिक त्रास होत असावा. कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी सेंट्रल लाईन ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एका रूग्णांचा ऑक्सिजन कसा काय बंद करता येतो ? असे सांगून आक्सिजन बंद करण्याचा प्रकार कधीही घडलेला नाही, असे डॉक्टर डुमणे यांनी सांगितले.
 कोरोनाग्रस्ताचा मृत्यूपूर्व व्हिडिओ व्हायरल
परंडा तालुक्यातील आसू येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा रविवारी (दि.५) पहाटे जिल्हा रुग्णालयातील काेविड हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु, त्याने मृत्यूपूर्वी स्वत:च्या मोबाइलमध्ये अर्धा ते एक मिनिटांचे दोन ते तीन व्हिडिओ बनवून भावाला पाठवत उपचारादरम्यान डॉक्टर येत नाहीत, रात्री ऑक्सिजन बंद करतात, कोणीच लक्ष देत नाहीत, असा आरोप केल्याने कोविड रुग्णावरील आरोग्य विभागाच्या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. व सदर एका वृत्त वाहिनीवर आल्यामुळे प्रशासनाने याचा पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात अधिक माहिती दिली.
 
Top