उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दि.31 जुलै,2020 पर्यंत वाढविला असून लॉकडाऊनच्या कालावधी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 1 जुलै, 2020 पासून ते 31 जुलै, 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येईल त्या ठिकाणी CONTAINMENT ZONE जाहीर करण्याचे अधिकार संबंधित उपविभागाचे INCIDENT COMMANDER म्हणून उपविभागीय अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रासाठी राहतील. संबंधित CONTAINMENT ZONE बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालू राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सूचित करतील. हे आदेश CONTAINMENT ZONE वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रासाठी लागू राहतील.
 तसेच भविष्यामध्ये जर जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास त्याठिकाणी संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे त्या  ठिकाणी नव्याने CONTAINMENT ZONE जाहीर करुन वेगळा आदेश काढून त्या झोन मध्ये कोणत्या बाबी चालू राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सूचित करतील.
नागरिकांच्या आवश्यक नसलेल्या हालचालीस उदा. खरेदी (shopping), मैदानावरील व्यायाम (Outdoor exercise) इ. ला जवळच्या क्षेत्राच्या मर्यादेत सर्व विहित केलेल्या आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना उदा. मास्क, स्वच्छ रुमालाचा वापर, सामाजिक अंतराचे पालन व वैयक्तिक स्वच्छतेच्या अटीवर परवानगी राहील.
परिशिष्ट 2 मध्ये नमूद केलेल्या चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी व अत्यावश्यक मानवी गरजासाठी (वैद्यकीय उपचार, सेवेसह) व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध असणार नाहीत.
परिशिष्ट 1 मध्ये नमूद  केलेल्या कोविड-19 व्या व्यवस्थापनासाठीच्या राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील. परिशिष्ट-2 मध्ये नमूद केलेल्या ज्या बाबींना अगोदरच वेळोवेळी परवानगी दिलेली आहे ते दि. 31 जुलै 2020 पर्यंत कायम राहतील.या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)कलम 188 व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
या आदेशाची अंमलबजावणी दि. 1 जुलै 2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.
परिशिष्ट-1 : कोविड-19 चे व्यवस्थापनासंदर्भात राष्ट्रीय सूचना :
चेहरा झाकणे : सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी, प्रवासादरम्यान नागरिकांनी तोंडावर मास्क, स्वच्छ रुमालाचा वापर करणे आवश्यक आहे.
सामाजिक अंतराचे पालन : सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींनी एकमेकांमध्ये कमीत कमी 6 फूट अंतर (2 गज की दूरी) ठेवावे. आस्थापना, दुकाने यांनी एका वेळी 5 पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात, आस्थापनेत उपस्थित राहणार नाहीत. तसेच ग्राहकांमध्ये शारीरिक अंतर राहील याबाबत दक्षता घेणे आवश्यक राहील.
मेळावे : मोठे सार्वजनिक मेळावे, समारंभ यांच्यावरील निर्बंध कायम राहतील. विवाहासंबंधित मेळाव्यांमध्ये, समारंभांमध्ये 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही. अंत्यविधीच्या, अंत्ययात्रेच्या कार्यक्रमांमध्ये 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास राज्य शासन, स्थानिक प्रशासनाकडून कायदे व नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, गुटखा, तंबाखू इ. तत्सम पदार्थाचे सेवन करण्यास परवानगी असणार नाही.
कामाच्या ठिकाणांबाबत अधिकच्या सूचना :
घरुनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) : शक्य असेल तोपर्यंत घरुनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) या पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने,
बाजारपेठा, औद्योगिक व वाणिज्य आस्थापनांचे ठिकाणी काम, व्यवसायाच्या तासांची सुनियोजितपणे आखणी करणे आवश्यक राहील.
तपासणी व स्वच्छता (Screening and hygiene) : सर्व प्रवेश व निर्गमनाचे ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग करणे, पुरेशा प्रमाणात हॅण्डवॉश व सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील.
वारंवार निर्जंतुकीकरण : कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारी संपूर्ण जागा, सार्वजनिक सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व जागा उदा. दरवाजाचे हॅण्डल इ. दोन्ही पाळयांच्या दरम्यानच्या कालावधीत करावयाच्या स्वच्छतेसह वारंवार निर्जंतुक होईल, याबाबत दक्षता घ्यावी.
सामाजिक अंतराचे पालन : कामांच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होण्यासाठी कामगारांमध्ये पुरेसे अंतर, दोन शिफ्टमध्ये पुरेसा अवधी ठेवण्यात यावा. तसेच कर्मचाऱ्यांचे दुपारच्या जेवणाचे वेळी इ. ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होईल याबाबत दक्षता घ्यावी.
परिशिष्ट 2 :
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ज्या बाबींना स्पष्टपणे प्रतिबंध केलेला नाही किंवा बंदी घातलेली नाही. त्या सर्व बाबी वेळोवेळी काढलेल्या आदेशांमध्ये घालण्यात आलेल्या निर्बंधांनुसार चालू राहतील.
सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना दुचाकी वाहनावर 1 चालक, तीन चाकी वाहनामध्ये एक वाहनचालक व दोन प्रवासी, चार चाकी वाहनामध्ये एक वाहन चालक व इतर दोन प्रवासी अनुज्ञेय राहतील.
सुरक्षित शारीरिक अंतर ठेवून व स्वच्छतेच्या उपाययोजना करुन विहित केलेल्या प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने जिल्हाअंतर्गत बससेवा सुरु राहील. यासंदर्भात परिशिष्ट 3 मधील सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
आंतर जिल्हा बस वाहतुकीवरील नियंत्रण कायम राहील. सर्व मार्केट, दुकाने ही सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत उघडी राहतील.
खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर संबंधित तालुक्याचे INSIDENT COMMANDER तथा तालुका दंडाधिकारी यांची परवानगी घेऊन लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी राहील.
सार्वजनिक मोकळ्या जागी व्यायाम (Outdoor Physical Activities) करण्यास परिशिष्ट 2 मधील अटी व शर्तीवर परवानगी राहील. वृत्तपत्रांची छपाई व वितरण (घरपोच सेवेसह) करण्यास परवानगी आहे.
शैक्षणिक संस्था (विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा) ची कार्यालये, कर्मचारी यांना ई-सामग्री (e-content) चा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन, निकाल घोषित करणे यासह फक्त अशैक्षणिक कामकाजासाठी कार्यालये चालू करता येतील.
केश कर्तनालये, सलून्स, ब्युटी पार्लर्स राज्य सरकारने दिलेल्या परवानगीमध्ये नमूद अटी व शर्तीनुसार चालू करता येतील. स्पा सेंटर बाबत अद्याप राज्य शासनाचे आदेश प्राप्त नसल्याने स्पा सेंटर उघडणेस परवानगी असणार नाही.राज्य शासनाचे व जिल्हा प्रशासनाचे अन्य कोणत्याही विशिष्ट, सर्वसाधारण आदेशानुसार परवानगी दिलेल्या बाबी परवानगी आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्तीसह चालू राहतील.

 
Top