उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
  जिल्ह्यात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या अंमलबजावणीला सुरुवात जानेवारी 2019 पासून करण्यात आली आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील गोरेवाडी, बुकनवाडी, दुधगाव, कोलेगाव, रुई-ढोकी, कावळेवाडी, गोवर्धनवाडी, गोपाळवाडी तसेच लोहारा तालुक्यातील तोरंबा, उमरगा तालुक्यातील बाबळसुर,भगतवाडी व बोरी आणि परंडा तालुक्यातील दहिटणा (बोडखा) या तेराग्रामपंचायतीचा समावेश असून सद्यस्थितीत या ग्रामपंचायतीमध्ये विविध प्रकारची कामे व उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासाठी ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे तेरा ग्राम परिवर्तक यांची नियुक्ती महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे करण्यात आलेली आहे.
हे ग्रामपरिवर्तक नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमध्येच वास्तव्यास असल्याने ग्रामपंचायतीमध्ये आवश्यक असणाऱ्या बाबी संदर्भात समरुप होऊन कामकाज करण्यास सुलभता होत आहे. गावाच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार विविध घटकांच्या आधारे व      ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या एकूण 16 मुख्य निर्देशकांच्या आधारावर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अभिसरणातून  गाव विकास आराखडा नुसार अंमलबजावणी सुरु आहे.
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे प्रती महसुली गाव चार लक्ष प्रमाणे 13 ग्रामपंचायतीमधील 18 महसुली गावास प्राप्त ग्राम कोष निधी देण्यात आला आहे.  या 72 लक्ष रुपये निधीपैकी आजपावेतो 71 लक्ष इतका म्हणजे 98 टक्के इतका निधी खर्च झालेला आहे. यामध्ये गावाच्या गरजेनुसार विविध कामे करण्यात आली आहेत. ज्या कामांना कोणत्याही योजनेतून निधी प्राप्त होऊ शकत नव्हता, यामध्ये विशेषतः शाळा, अंगणवाडी रंगरंगोटी, डिजिटल शाळेसाठी उपयुक्त प्रोजेक्टर, कॉम्प्यूटर, प्रिंटर, शाळासाठी सोलर सिस्टीम, हॅन्ड वॉश स्टेशन, अंगणवाडीसाठी लहान मुलांना बसण्यास उपयुक्त टेबल व खुर्ची अशा अनेक बाबी ग्राम कोष निधीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरोना जागतिक महारोगराईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनात्मक बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अभियानातील समाविष्ट सर्व तेरा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायत शिपाई यांच्या मदतीने पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी ग्रामपंचायतीद्वारे थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटर खरेदी करण्यात आले आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये सर्व ग्रामस्थांची थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटर द्वारे तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी त्याच पद्धतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटरद्वारे सर्व ग्रामस्थांची तपासणी लवकरात लवकर पूर्ण करुन घेण्याचे आवाहन करुन तपासणीमध्ये सर्व सहभागी कोविड योध्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top