उस्मानाबाद /प्रतिनिधी
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसर येथील कोविड संशोधन केंद्रास (Covid-19 Testing & Research Facility Center) ‘आयसीएमआर’ची अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे. विद्यापीठाच्या औरंगाबाद परिसरात यापूर्वीच लॅब सुरू झाली असून दोन नॉन मेडिकल लॅब असणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे.
 औरंगाबादसह मराठवाड्यात कोरोना संख्या झपाट्याने वाढत असल्याने या दोन्ही लॅब केव्हा सुरू होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या संदर्भात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर (AIIMS) यांच्यावतीने मंजुरी देण्यात आल्याचे पत्र मंगळवार (दि.२१ ) प्राप्त झाले, अशी माहिती मा कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी दिली.इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्या वतीने  ‘एम्स’ला कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यास मान्यता देणे बाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक ती तयारी करून मान्यता मिळण्यासाठी विद्यापीठाने पाठपुरावा केला. ‘एम्स’च्या टीमने विद्यापीठातील लॅबसाठी उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, यंत्रसामुग्री या संबंधीची संपूर्ण पाहणी करून अहवाल सादर केला. त्यानंतर स्वॅब टेस्टिंग सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठाच्या उस्मानाबाद परिसरातील कोरोना टेस्टिंग लॅब पासून (दि.२२ ) कार्यान्वित होत आहे. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांच्या पुढाकाराने ही लॅब साकारत आहे. विद्यापीठ व सीएसआर फंडातून सदर लॅब साकारली आहे.  गेल्या तीन महिन्यापासून  या कामाचा पाठपुरावा करून उस्मानाबादवासियासाठी लॉकडाऊन काळातील दिलासादायक असे मोठे काम करीत आहेत. मा कुलगुरू डॉ  प्रमोद येवले,  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, उपपरिसर संचालक डॉ डी के गायकवाड, नोडल ऑफिसर डॉ प्रशांत दीक्षित यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे.
या संशोधन केंद्रास लवकरच ‘नॅशनल अॅक्रीडिटेशन बोर्ड फॉर टेस्टींग अॅण्ड कॅलीब्रेशन लॅबोरेटरीज’ यांच्यावतीने अधिस्वीकृतीचे पत्रही मिळणार आहे. या केंद्रात अगोदरच ट्रायल स्वॅब टेस्टिंग’चे काम सुरु करण्यात आलेले आहे, आता आयएमसीआरची मान्यता मिळाल्याने हे काम गतीने होणार आहे.
विद्यापीठासाठी अभिमानाचा क्षण :मा. कुलगुरू
 डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कोरोना टेस्टिंग लॅबचे प्रत्यक्ष काम सुरू झाले. आता उस्मानाबाद उपपरिसर येथील टेस्टिंग लॅब सुरू होत आहे , ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.  मराठवाड्यात व विशेषतः औरंगाबाद, बीड , उस्मानाबाद परिसरासात संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कोरोना टेस्टिंग व अन्य संशोधन कार्य होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना संदर्भात संशोधन या केंद्रात लगेचच सुरू करण्यात येणार आहे.  सीएसआर फंडातून कुटी व विद्यापीठाचे  वीस लाख  असा हा एक कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करुन कोविड संशोधन केंद्र तातडीने उभे केल्याबद्दल उस्मानाबाद यांच्या वतीने मा. कुलगुरू, जिल्हाधिकारी, व्यवस्थापण परिषदेचे सर्व सदस्य सीएसआर फंड देणाऱ्या सर्व संस्था यांचा आभारी आहे, असे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर म्हणाले. आगामी काळात कोविड-19 चा प्रसार रोखण्याकरिता हे संशोधन केंद्र काम करणार असून या कोरोना युध्दात अनेक कोरोनायोध्दे जसे की, डॉक्टर, पोलीस आणि नर्स हे स्वत:च्या जिवावर उदार होऊन प्रतिकुल परिस्थितीत काम करित आहे. आणि या कोरोना योध्यांना काम करत असताना विषाणुचा संसर्ग होतो तेव्हा आपण हा संसर्ग कसा होतो? आणि त्याचा प्रसार होण्यास कसा अटकाव करता येईल, या केंद्रात संशोधन करुन या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. दरम्यान, दोन आठवड्यापुर्वी सुरू झालेल्या औरंगाबाद येथील  मुख्य परिसरातील लॅबमध्ये आज पर्यंत तीन हजार १०० टेस्टींग झाले आहेत, की संचालक डॉ गुलाब खेडकर यांनी दिल्ली.. या सर्वांना विद्यापीठ प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करील असेही मा कुलगुरू डॉ प्रमोद येवले म्हणाले. दरम्यान, कोरोना टेस्टींग लॅबला मंजुरी मिळाल्याबद्दलl प्र-कुलगुरू डॉ प्रवीण वक्ते व कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top