उमरगा/प्रतिनिधी-
लाॅकडावूनबाबतचा निर्णय हा लोकांच्या म्हणण्यानुसार घेता येणार नाही. त्याबाबत योग्य उपाययोजना करूनच निर्णय घ्यावे लागतात. सध्याची उमरगा शहरातील परिस्थिती पाहता येत्या शनिवारपासून आठ दिवस लॉकडाऊन करण्याचे संकेत देत येणाऱ्या काळात उमरगा शहरात नियोजनबद्धरित्या उपाययोजना आखून कोरोनावर नियंत्रण मिळवावे लागणार आहे. धारावी व मालेगावच्या पार्श्वभूमीवर उमरगा शहरात उपाययोजना करून उमरगा मॉडेल तयार करू. प्रशासन आपल्या परीने सर्व प्रयत्न करीत असले तरी आता नगरसेवकानी ही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून कोरोनाला आळा घालता येईल असे मत जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी व्यक्त केले.
उमरगा शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाबाबत व त्यावर करावयाच्या उपाययोजना संदर्भात  महसूल, पालिका प्रशासन व पालिका पदाधिकाऱ्यांसोबत मंगळवारी दि. २१ रोजी पालिका सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली. उमरगा शहरात गेल्या दहा बारा दिवसात कोरोना रुग्णाची वाढती संख्या, यावर करावयाचे उपाययोजना तसेच जनतेतून लाॅकडावूनची वाढती मागणी यासंदर्भात घेतलेल्या बैठकीसाठी आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार,जिल्हा वैद्यकिय अधिक्षक हणमंत वडगावे, मुख्याधिकारी जाधवर यांच्यासह पालिकेतील नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी मुंडे यांनी नगरसेवक, नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी तात्काळ लॉकडाऊन लागू करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी मुंडे यांनी कोरोना संदर्भात महसुल, आरोग्य, पोलीस प्रशासन गेली तीन चार महिने प्रयत्न करीत आहे. पण सर्वच जबाबदाऱ्या प्रशासनावर ढकलणे योग्य नाही. आता पालिका प्रशासनाने व लोकप्रतिनिधीनीही स्वतः पुढाकार घेणे गरजेचे आहे. पालिका सदस्यांनी आपआपल्या वार्डात स्वयंसेवक नेमावेत. त्यांनी घरोघरी जाऊन कोरोना संबंधी जनजागृती करावी, ऑक्सिमीटर द्वारे वार्डातील नागरिकांची तपासणी करावी, संदिग्ध वाटणाऱ्यांना तात्काळ दवाखान्यात स्वॅबसाठी पाठवावे, ताप, खोकला, सर्दीचे लक्षण असणाऱ्यानी स्वतःहून स्वॅब नमुना देण्यासाठी जनजागृती करावी. शरीरात प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आहार नियोजनाचे महत्व नागरिकांना पटवून द्यावे. तसेच पालिकेतील सदस्यांनी एकमेकांवर आरोप करण्याऐवजी मिळून काम केल्यास कोरोना महामारीला रोखण्यात यश मिळणार आहे. पालिका प्रशासनाने जास्तीत जास्त ऑक्सिमीटर खरेदी करून शहरातील नागरिकांची तपासणी मोहीम सुरू करावी‌. तसेच शहरभर फवारणी करावी त्याच बरोबर प्रशासनाने शहरातील दाटीवाटीच्या वस्तीवर उपाययोजना राबवून जास्त भर द्यावा. सामूहिक संक्रमन रोखण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करणे गरजेचे असुन आर्सेनिक गोळ्या वाटप कराव्यात, मस्जिद, मंदिरातील भोंग्याद्वारे त्यात्या भागात कोरोना बाबत घ्यावयाच्या खबरदारी, उपाययोजनाची माहिती द्यावी. बाहेर गावाहून आलेल्या प्रत्येकाला पाच दिवस होम क्वॉरनटाईन बंधनकारक करावे अशा सूचनाही दिल्या तसेच शहरात मोहल्ला क्लिनिक सुरू करण्याचे सूचना करीत नागरिकांना मोहल्ला क्लिनिक मध्ये प्राथमिक तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे हे सर्वांनी मिळून केल्यास शहरात जो कोरोनाचे संक्रमन अवस्था दिसत आहे. त्याला लगाम लागणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात उमरगा शहर व तालुक्यात कोरोनावर शंभर टक्के नियंत्रण मिळविण्याचे उद्दीस्ट ठेवू व धारावी, मालेगाव पॅटर्नसारखे उमरगा पॅटर्न अमलात आणू असे सांगितले.

 
Top