उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही, त्यापेक्षा शहरातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरसेवकांसह न.प.च्या सर्व यंत्रणेने एकत्रित प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
उस्मानाबाद नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा  जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत  बुधवारी (दि.२२) पार पडली यावेळी त्या बोलत होत्या. सर्व प्रथम जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्व नगरसेवकांकडून कोविड-१९ च्या अनुषंंगाने त्यांची मते, अडचणी, उपाययोजनाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी बहुतांश नगरसेवकांनी कडक लॉकडाऊनची मागणी केली. तर काहीनी लॉकडाऊन करताना सर्वच अस्थापना बंद ठेवाव्यात, काहींनी शहरात लॉकडाऊन सुरू असताना पानमटेरीयल, अवैध दारू, मटका यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी केल्या. तसेच काही नगरसेवकांनी कोविड रुग्णांच्या अंत्यविधिसाठी देण्यात येणारे सुरक्षा साहित्य दर्जेदार मिळावेत, तर नगराध्यक्षांनी भविष्यात वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भाडेतत्वावर शवदाहवाहिनी घेण्याबाबतही विषय मांडला. सर्वांची मते ऐकूण घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सध्या शासनाकडून अनलॉकची प्रक्रीया सुरू आहे, नागरिकांना जास्त दिवस आपण घरात बंधिस्त करू शकत नाहीत, त्यामुळे लॉकडाऊन हा सततचा पर्याय नाही. येत्या काळात नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असून याकरीता निवडणुकीप्रमाणे नगरसेवकांनी आपआपल्या भागात टीम तयार करून कोरोनाचा प्रसार राेखण्याबाबत घ्यावयाची काळजी व उपाययोजनांबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मुख्याधिकारी यल्लमट्टे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चार दिवसाला ऑक्सीमीटर व थर्मामीटरने तपासणी करावी
 नगराध्यक्ष राजेनिंबाळकर म्हणाले की, हा नागरिकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना व्यवस्थित समजावून सांगावे, याबाबत सातत्याने माहिती देऊन जनजागृती करावी, प्रभागनिहाय समित्या गठित केल्या असून यामध्ये आणखी स्वयंसेवक वाढवून जनजागृतीबरोबरच आपल्या भागातील आजारी , बाहेरून आलेले नागरिक आदींवरही लक्ष ठेवावे, चार दिवसाला ऑक्सीमीटर व थर्मामीटरने तपासणी करावी असे आवाहन सर्व सदस्यांना केले.

 
Top