उस्मानाबाद/प्रतिनिधी- 
शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून मागील एक महिन्यापासून उस्मानाबादमधील शेतकऱ्यांसाठी  प्रबोधन तसेच मौलिक सल्ला देण्याचे मोफत काम सुरू आहे.   
नेताजी जगताप हे उस्मानाबाद तालुक्यातील रुईढोकी येथील शेतकरी... त्यांची २ एकर कोरडवाहू जमीन आहे. घरची परिस्थिती बेताचीच.... त्यात आता मुलीचे लग्नही करायचे आहे. सन 2012 ला त्यांनी 29 हजार रुपये कर्ज घेतले होते व त्यांचे 2015 ला पुनर्घटन केले होते. 2016 च्या कर्जमाफीत त्यांना लाभ मिळालेला नाही तसेच या वर्षीच्या कर्जमाफीतही त्यांचे नाव अजून आलेले नाही. बँकेत ४ ते ५ वेळा हेलपाटे मारले तरी प्रतिसाद मिळू शकला नव्हता. कारखान्यावर रोजंदारीने काम करायचे, बँकेत जाऊन हेलपाटे मारायचे, वाढणारा कर्जाचा बोजा, यामुळे मानसिक तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला होता.याच वेळी व्हाट्सअप ग्रुपवर त्यांना शिवार हेल्पलाईनचा   संपर्क क्रमांक मिळाला व त्यांनी लगेच हेल्पलाईनवर संपर्क साधून स्वत:ची अडचण सांगितली. शिवार फाऊंडेशनच्या जिल्हा प्रतिनिधींनी तातडीने ढोकी येथील SBI बँक मॅनेजरना नेताजी जगताप यांची वस्तुस्थिती सांगितली. बँक मॅनेजर स्वतः शेतकऱ्याशी फोनवर बोलले व त्यांचा विषय लागलीच मार्गी लागला.
‘बँकेकडून शासनाला तुमची सर्व माहिती पाठविली आहे, कर्जमाफी याद्या अजूनही येणे चालू आहेत, तुमचे प्रकरण या निकषात बसले तर कर्ज माफही होऊन जाईल’ स्वतः बँकेचे मॅनेजर शेतकऱ्याला फोनवर असे  बोलल्यामुळे नेताजी जगतापांना माेठा दिलासा मिळाला. यापुढे जावून ते आता कर्ज न काढता मुलीच्या लग्नासंदर्भात हेल्पलाईनद्वारे मार्गदर्शन, समुपदेशन घेत आहेत.
शिवार हेल्पलाईनला फाेन करून जसा माझा प्रश्न सुटला तसेच इतर गरजू शेतकऱ्यांनी 8955771115 या शिवार हेल्पलाईनवर फोन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हेल्पलाईन सकाळी १० ते रात्री ६ या वेळेत उपलब्ध आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात अशा नेताजी जगतापांंसारख्या शेतकऱ्यांची संख्या निश्चितच खूप जास्त आहे. मात्र शिवार फाउंडेशन आणि त्यांची हेल्पलाईन अशा शेतकऱ्यांना तणावमुक्त करण्यासाठी, त्यांना पुढील आयुष्य सुखाने जगण्यासाठी नेमके काय करायचे, यासाठी उत्तम प्रकारे समुपदेशन करीत आहे. यातून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच यश मिळेल, असा विश्वास शिवार फाऊंडेशन प्रमुख विनायक हेगाणा आणि समन्वयक अशाेक कदम यांनी व्यक्त केला आहे.

 
Top