तेर/प्रतिनिधी-
 उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य विभागाकडून रुग्णांच्या संपर्कातील २५ नागरिकांची उस्मानाबाद येथील विलिनीकरण कक्षात रवानगी करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने गावात कोरोनाचा प्रसार व संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गावात फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जागजीच्या वतीने गावातील नागरिकांचा सर्व्हे करून थर्मलकॅनिग करण्यात येत आहे.
अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला येथील पती -पत्नी तेर येथील ग्रामीण रूग्णालयात     श्र्वसनाचा त्रास होत असल्याने उपचारासाठी आले. त्यांच्या स्वॅबचे नमुने ३ जुलै रोजी तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते.  त्याचा अहवाल 5 जूलैला येऊन पतीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला असून पत्नीचा अहवाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे इर्ला येथे एकच खळबळ उडाली अाहे. आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या जवळील २५ नागरिकांचे उस्मानाबाद येथील विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे तर ग्रामपंचायतीच्या वतीने
सोडियम हायपोक्लोराईड फवारणी करण्यात आली असून प्राथमिक आरोग्य केंद्र जागजी येथील आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्या वतीने घरोघरी जाऊन सर्व्हे करीत नागरिकांची थर्मल स्कॅनिग करण्यात येत आहे. इर्ला येथे 5 जूलैला सायंकाळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ ऐवाळे यांनी भेट देऊन पाहणी करून आरोग्य कर्मचाऱ्यांना उपाययोजना संदर्भात सुचना केल्या तर ६ जुलै रोजी आ. राणाजगजितसिंह पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी इर्ला येथे भेट देऊन आरोग्य विभागास योग्य त्या सुचना करून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने १९ जुलै पर्यंत गावच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत.

 
Top