उस्मानाबाद / प्रतिनिधी-
राज्यात सन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती व अंमलबजावणीसाठी विमा कंपन्याची निवड करण्यात आलेली आहे. योजना अंमलबजावणी संदर्भात खरीप हंगाम 2020-21 मध्ये दिनांक 24 जुलै, 2020 अखेर 12 हजार 339 कर्जदार शेतकरी व 6 लाख 58 हजार 129 बिगर कर्जदार शेतकरी असे एकूण 6 लाख 70 हजार 468 शेतकऱ्यांनी  योजनेत सहभाग नोंदविला आहे. गत हंगामातील पुर्वानुभव पाहता अंतिम आठवड्यामध्ये योजनेमध्ये शेतकरी मोठया संख्येने सहभाग नोंदवितात. योजनेत खरीप हंगामासाठी सहभागाची अंतिम मुदत दि. 31 जुलै, 2020 आहे. विमा नोंदणी करण्यासाठी  मुदतवाढ करण्याची  मुभा केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनूसार अनुज्ञेय नाही.
 राज्यात बहुतांश शेतकरी आपले सरकार सेवा केंद्रामार्फत योजनेत सहभाग नोंदवितात. त्यामुळे इतर अत्यावश्यक सेवांबरोबरच आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नोंदणी सुविधा कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान पिक विमा योजनेच्या नोंदणीसाठी आवश्यक त्या निबंर्धासह चालू ठेवणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंमलबजावणीसाठी या योजनेत खरीप हंगामासाठी सहभागाची अंतिम मुदत दि.31 जुलै 2020 आहे. त्यानुसार दिनांक 31 जुलै, 2020 पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी, व्हीएलई केंद्र) 24x7 तास सुरु ठेवण्याबाबत परवानगी दिली आहे.
या केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी यांनी सोबत ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील. तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी 24X7 तास सुरु ठेवल्याने COVID-19 विषाणूचा संसर्ग होणार नाही. यादृष्टीने मास्क, स्वच्छ रुमाल, सॅनिटायझरचा वापर व शारीरिक अंतराचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच आपले सरकार सेवा केंद्रावर (सीएससी, व्हीएलई केंद्र) येणाऱ्या पिक विमा नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून देखील याबाबींचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी  राजेंद्र खंदारे यांनी केले आहे.
 
Top