उस्मानाबाद / प्रतिनिधी
 संकटावर मात करण्यासाठी गेल्या 100 दिवसापासून देशभर लॉकडाऊन आहे .त्यामुळे सर्वसामान्य जनता, मजूर व गोरगरीबांचे अतोनात हाल झाले. त्यातच आता सोयीसुविधा, रुग्णासाठी खाटा व रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात पुरवण्या ऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करून सर्वसामान्य जनता, मजूर व गोरगरिबांचे जीवन उद्ध्वस्त केले असल्याची टीका जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे .
देशात सर्वाधिक करोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असून शासकीय यंत्रणा कुचकामी ठरली आहे. महाराष्ट्र सरकारने आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना अमर्याद अधिकार बहाल केल्यामुळे राज्यात अंदाधुंदी निर्माण झाली आहे. मनाला वाटेल असे स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन आयुक्त, जिल्हाधिकारी ,पोलिस अधिकारी हे आपण जनतेचे नोकर आहोत हे विसरून गेले असून ते जनतेलाच कोरोनाच्या संकटातही गुलामासारखी वागणूक देत आहेत .दुष्काळा प्रमाणे टाळेबंदीतही शासकीय अधिकाऱ्यांना सुगीचे दिवस आले असून गोरगरीब व मजूर मात्र भुकेने मरत आहेत .महाराष्ट्रात कोरूनाग्रस्तांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून महाराष्ट्र सरकार कोरुणा महामारी आटोक्‍यात आणण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने महाराष्ट्रात लक्ष घालून रुग्णांच्या उपचारासाठी मोठी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे .महाराष्ट्र सरकार फक्त मोठ्या घोषणा करण्यातच पटाईत आहे, कृती मात्र शून्य आहे. त्यामुळे कोरोना संकटात सर्वसामान्य जनता , मजूर ,गोरगरीबांना आधार देण्यासाठी महाराष्ट्रात केंद्र सरकारने लक्ष घालण्याचे विनंती ॲड भोसलेंनी केली आहे.
 
Top