लोहारा/ प्रतिनिधी
भाजपा लोहारा तालुक्याच्यावतीने शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोर दि. 22 जून  रोजी राष्ट्रीयकृत बँकामार्फत शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता तात्काळ कर्ज द्यावे, या मागणीसाठी शासनाच्या विरोधात निदर्शने करून बँक मॅनेजर व तहसीलदार विजय अवधाने यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शासनाच्या व बँकेच्या विरोधातील फलक हातात घेऊन घोषणाबाजी करीत हे आंदोलन करण्यात आले.
 निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुका अविकसित आहे, या तालुक्यात कायमस्वरूपी शेतकऱ्यांना प्रशासकीय हलगर्जीपणामुळे पिक विमा, पीक कर्जापासून वंचित राहण्याची दुर्देवी वेळ येत आहे. तसेच शासन शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाच्या उदासीन कारभारामुळे अधिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना कर्जाच्या पाशात अडकलेले आहेत. महाविकास आघाडी सरकारने दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा मोठ्या धुमधडाक्यात केली. परंतु प्रत्यक्षात कर्जमाफी दिली नाही. कर्ज माफीची अंमलबजावणी होऊ न शकल्याने महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना खरीप सन 2020 हंगामा करिता शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. तसेच शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बांधवांना बँकेतून अपमानित होऊन परतावे लागत आहे. शासनाने नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतकऱ्यांना 25 हजार व फळबाग शेतकऱ्यांना 50 हजार ची घोषणा केली होती, ही घोषणा हवेत जिरली त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत आला आहे.  तरी शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना खरीप ,2020 हंगामाकरिता तातडीने नियोजन करून कर्ज उपलब्ध करून द्यावे व बँकेच्या मनमानी कारभाराला आळा बसवावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संघशेट्टी, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, शहराध्यक्ष आयुब हबीब शेख भाजपा मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला. युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडू तिघाडे, प्रमोद पोतदार, माणिक बिराजदार, कल्याण ढगे, दादा मुल्ला, शंकर मुळे. विजय दरेकर, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
 
Top