उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर मा.परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी राज्यातील परिवहन कार्यालयातील विविध कामे सुरु करण्याचे निर्देश दिलेले आहेत. कार्यालयामध्ये विविध कामकाज जसे- नविन अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती चाचणी अनुज्ञप्ती दुय्यम प्रत करणे, वाहन नोंदणी वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे, वायूवेग पथक, योग्यता प्रमाणपत्रा नुतणीकरण इ. कामकाज सुरु करण्यात आलेली आहेत,अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिली.
कार्यालयात गर्दी होऊ नये यादृष्टीने प्रत्येक अर्ज हा ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊनच स्विकारण्यात येत आहे. त्याकरिता उपलब्ध असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या संख्येनुसार ऑनलाईन प्रणालीत अपॉईंटमेंट कोटा निश्चित करण्यात आला असून जेणे करुन कार्यालयात गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच कोवीड-19 पार्श्वभूमीवर सदर कामकाज पार पाडत असतांना कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना खालील प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत.
संपूर्ण कार्यालय नियमितपणे सॅनिटाईज करणे, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी मास्क, ग्लोव्हज वापरणे, सोशल डिस्टेंस ठेवणे, कार्यालयात येणा-या अभ्यागतांसाठी कार्यालयाच्या मुख्य गेटवर सॅनिटाईजर पुरविण्यात आले असून प्रत्येकांचे थर्मल स्क्रिनिंग तपासूनच कार्यालयात प्रवेश देण्यात येत आहे.अर्जदारांमध्ये किमान 6 फुटाचे अंतर ठेवण, एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक/की-बोर्ड सॅनिटाईज करणे, शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती चाचणीस येणाऱ्या अर्जदाराने मास्क व हँडग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश करणे. पक्की अनुज्ञप्ती चाचणीपूर्वी वाहन सॅनिटाई करणे व एका उमेदवाराची चाचणी झाल्यानंतर वाहन सॅनिटाईज करुनच दुसऱ्या उमेदवाराची चाचणी घेणे, योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरणाच्या वेळी वाहन सॅनिटाईज करणे इ. करिता जिल्ह्यातील सर्व वाहनचालक/मालक यांना कळविण्यात येते की, या कार्यालयाशी संबंधीत सर्व कामे ही ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊन कार्यालयात सादर करावीत व वरील सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.

 
Top