तुळजापूर / प्रतिनिधी:
भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने पाठीमागून ठोकरल्याने स्कुटीस्वार दोन शिक्षिका जागीच ठार झाल्या शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. मयत दोघी सोलापूर जिल्ह्यातील असून अणदूर येथील जिल्हा परिषद शाळेत त्या शालेय समितीच्या बैठकीसाठी आल्या होत्या.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील वत्सला नगर जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी शिक्षण समितीची बैठक होती. दुपारी बैठक पार पडल्यानंतर पाठ्यपुस्तके घेऊन सोलापूरच्या भंडारकवठे येथील शशिकला नागेश कोळी (वय 34) आणि रोहिणी शंकर सपाटे (वय 35) या दोघी शिक्षिका दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास परत निघाल्या. 4 वाजण्याच्या सुमारास त्या जळगाव तलावानजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर भरधाव वेगातील एका अज्ञात वाहनाने पांढऱ्या रंगाच्या एक्टिवा (एमएच 13-सीएच 9867) ला पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, मयत महिलांची गाडी जवळपास 50 फूट लांब घसरत गेली. गाडीवरील दोन्ही महिलांचे शव छिन्नविच्छिन्न झाले होते. अपघातानंतर इटकळ दुरक्षेत्राच्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
 
Top