कळंब /प्रतिनिधी
राज्यातील जिल्हापरिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांची आंतरजिल्हाबदली प्रक्रिया पुर्ण करुन बदलीपात्र शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्यासाठी कार्यमुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहीती प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे व ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यात जिल्हापरिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षक संवर्गाची आंतरजिल्हाबदली टप्पा ४ ची आँनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया फेब्रुवारी २०२० मध्येच पुर्ण करण्यात आली असुन एप्रिल मध्ये कार्यमुक्ती आदेश मिळणे अपेक्षित  होते पण मार्च महिन्यापासुन कोविड १९ च्या जागतिक  संकटामुळे आंतरजिल्हाबदली टप्पा क्र.४ प्रलंबित राहिला आहे.या घडीला कोविड १९ संसर्गाची साथ असतानाही आंतरजिल्हाबदली पात्र शिक्षकांनीही प्रशासनाने नेमुन दिलेली कामे आपले कर्तव्य समजुन सुट्टीत सुद्धा कुटूंबा पासून दूर राहुन नोकरीच्या जिल्ह्यात कर्तव्य समजून पुर्ण केली आहेत. फेब्रुवारी २०२० मध्येच बदलीची ९० टक्के  प्रक्रिया पुर्ण झालेली फक्त बदलीचे आदेश देऊन कार्यमुक्त करणे बाकी आहे. ही प्रक्रिया एन.आय.सी.मार्फत फक्त २ ते ३ दिवसात पुर्ण करुन बदली पात्र शिक्षकांना स्वजिल्ह्यात बदली करणे शक्य आहे.
तसेच ही आंतरजिल्हाबदली विनंती बदली असल्याने शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसल्याने व संबंधित शिक्षकांची बदली स्वजिल्ह्यात होणार असल्यामुळे ते आपल्या जिल्ह्यात मानसिक स्वास्थ्य राखुन पुर्ण क्षमतेने आपले काम करु शकतात. तरी अशा बदली पात्र शिक्षकांची विनाविलंब बदली करुन संबंधित शिक्षकांना न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर शिक्षक नेते संभाजीराव थोरात, शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे , कार्याध्यक्ष आंबादास वाजे,सरचिटणीस आप्पासाहेब कुल,कोषाध्यक्ष जनार्धन नेऊंगरे,महिला आघाडी प्रमुख श्रीमती अनुराधा तकटे यांच्या सह्या आहेत.

 
Top