तुळजापूर /प्रतिनिधी
राज्य उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेच्यावतीने  राज्यभर आमरण उपोषण करण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुळजापूर तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना मंजूर केलेल्या अनुदानाचे वितरित केले जात नसून वित्त विभागाने उच्च माध्यमिक शाळांची संपूर्ण माहिती तपासली तरीही अनुदानाचे वितरित केले जात नाही, सरकारने कायम हा शब्द काढला असेल तरीही अनुदान मिळत नाही, मंजूर निधीच्या वितरणाचा शासन आदेश निर्गमित होण्यास दिरंगाईमुळे अनेक विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हवालदिल झाले आहे त्यामुळे आर्थिक व मानसिक संतुलन बिघडत चालले आहे,याकाळात 95 शिक्षक बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत, आणखीन विलंब लावल्यास परिस्थिती आणि आणखीन गंभीर होऊ शकते त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी वित्त विभागाने पात्र ठरलेल्या उच्च माध्यमिक शाळांचा मंजूर अनुदान निधी वितरनाचा शासन आदेश निर्गमित करुन हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तहसीलदार तुळजापूर यांना दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष प्रा.बालाजी गुरव,तालुका उपाध्यक्ष प्रा. अनिल बनसोडे, लातूर विभाग कोषाध्यक्ष श्रीधर मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top