राहुरी /प्रतिनिधी-
 तालुक्यातील दरडगाव थडी येथील धनगर समाजाचे मुळाधरण ग्रस्त बांधव भाऊसाहेब भिवा गलांडे यांचे  वनक्षेत्रातील राहते घर व भुईमूग बाजरी या पिकावर वनविभागाने जेसीबी व रोटावेटर फिरवून जीवन उद्धवस्त केले आहे. त्यामुळे समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती, अशी कि भाऊसाहेब भिवा गलांडे हे गेल्या पंचवीस वर्षापासून सर्व कुटुंब या जागेवर व जमिनीत राहातात. दरडगाव थडी येथे गलांडे  प्रमाणे इतरही शेतकरी वनविभागाच्या जमिनीवर राहतात. परंतु वनविभागाने दुसर्‍या कुणावरही कारवाई न करता गलांडे कुटुंबावरच कारवाई केली. या कारवाईमध्ये संसारोपयोगी वस्तूंचा अक्षरशः चिंधड्या करण्यात आल्याचे दिसून आले आहे. तसेच घराच्या पेटीमधील सहा तोळे सोने रोख रक्कम दहा हजार रुपये या कारवाईमध्ये गहाळ करण्यात आले. कारवाई करणार्यांकडून महिलांना मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पुरुषांनाही दमदाटी व पोलीस बळाचा वापर करून भुईमुगाच्या व बाजरीच्या पिकांमध्ये रोटावेटर फिरवण्यात आला. ही कारवाई अतिशय जुलमी पद्धतीने करण्यात आली आहे. तसेच लहान मुलांना व बायकांना  वनविभागाने कार्यालयात नेले व पोलीस केस करण्याची धमकी दिली.
या जुलमी कारवाईमुले हे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून या कुटुंबातील महिलांनी न्याय मिळण्यासाठी आर्त हाक दिली आहे. तसेच जुलुमी कारवाई करणारे श्री देवखिळे व श्री पोकळे वनक्षेत्रपाल यांची चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तर सामाजिक कार्यकर्ते तथा यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची व तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
 
Top