उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयाच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेस मोठे योगदान आहे. शरद पवार यांच्यामुळे रेल्वे आली. तर अजित पवार यांच्यामुळे उजनीचे पाणी उस्मानाबादला मिळाले, त्या प्रमाणे २१ टीएमसी पाण्यासाठी ही मंजुरी मिळली.  येत्या पुढील काळात मेडीकल कॉलेज व विद्यापीठ उपकेंद्राचे पुर्ण विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी ऑनलाईन झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. पक्षाच्या वतीने अभिप्राय अभियान सुरू करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत  परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, डाॅ. नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हा परिषदेतील गटनेते महेंद्र धुरगुडे, नितीन बागल उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षस्थापनेपासून २१ वर्ष पूर्ण केले. कोरोनाच्या संकटामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी साध्या पध्दतीने उत्सव साजरा करावा आणि हे संपूर्ण वर्ष लोकसेवेसाठी अर्पण करावे, असे आवाहन केले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये ४१४ जणांनी रक्तदान केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. यासाठी पवार यांनी राज्यभर रक्तदान शिबिराचे नियोजन जिल्हा आणि तालूका पातळीवर करण्यास सांगितले होते.
त्याप्रमाणे उस्मानाबाद, उमरगा, लोहारा,तुळजापुर, कळंब, परंडा येथे घेतलेल्या शिबिरात ४१४ जणांनी रक्तदान करून या लढाईत आपले योगदान दिले आहे. गेल्या २१ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात यशस्वी कामगिरी केली आहे. राष्ट्रवादी पक्ष लोकशाहीच्या परंपरेत रुजलेला आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष लोकशाही, सामाजिक न्याय आणि पुरोगामी विचारांचे प्रबळ समर्थक आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्याचा आधुनिक इतिहास राष्ट्रवादीच्या योगदानाने व आदर्शानी घडविला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
 
Top