उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 व्याजाने घेतलेली रक्कम व्याजासह सावकाराला परत करूनही नावावर करून दिलेली शेतजमीन शेतकर्‍याला परत मिळाली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी या सावकारी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दिलेल्या निर्णयाने चार तपानंतर का होईना हक्काच्या जमिनीसाठी लढा देणार्‍या शेतकर्‍याला स्वतःची जमीन परत मिळाली आहे.
तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी भिमराव गुराप्पा आरळे यांनी अणदूर येथील श्रीशैल्य विश्वनाथ करपे यांच्याकडून सन 1979 मध्ये सात हजार रूपये प्रतिमाह 3 टक्के व्याजदराने घेतले होते. या रकमेला तारण म्हणून आरळे यांनी श्रीशैल्य यांचे भाऊ रवींद्र विश्वनाथ करपे यांच्या नावे गट नं. 62/2/2 मधील एक हेक्टर 80 जमिनीचे खरेदीखत करून दिले होते. मात्र ताबा भिमराव आरळे यांच्याकडेच होता. सावकाराची रक्कम व्याजासह अदा करूनही करपे यांच्या नावे करून दिलेली जमीन रवींद्र करपे यांनी परत भिमराव आरळे यांच्या नावे करून देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी तुळजापूर येथील सहाय्यक निबंधक यांनी प्रकरणाची चौकशी करून सावकारीचा व्यवहार हा 15 वर्षांपूर्वीचा असल्याच्या मुद्दावरून भिमराव आरळे यांचा अर्ज फेटाळला होता.
त्यानंतर आरळे यांनी अ‍ॅड. डी. एन. सोनवणे यांच्यामार्फत उस्मानाबाद येथील जिल्हा उपनिबंधक तथा सावकाराचे उपनिबंधक यांच्याकडे अपिल दाखल केले होते. अपिलात प्रकरणाची चौकशी होवून सावकाराचे उपनिबंधक तथा जिल्हा उपनिबंधक यांनी भिमराव आरळे यांना न्याय मिळवून दिला आहे. रवींद्र करपे यांच्या नावे करून दिलेले बेकायदेशीर खरेदीखत हे सावकारीतून झालेले असल्याने त्यांनी आरळे यांच्या नावे खरेदीखत करून देण्याचा आदेश पारित केला आहे. या निर्णयाने चार तपानंतर का होईना आरळे यांना स्वतःची जमीन परत मिळाली आहे.

 
Top