जिल्हा व्यापारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  उस्मानाबाद / प्रतिनिधी
 लॉकडाउन कालावधीत शहर व जिल्हाभरातील व्यापार्‍यांचे मोठे व्यावसायिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या व्यापार्‍यांचे गाळाभाडे, व्यवसाय कर, वीजबिल माफ करावे यासह अन्य मागण्या जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 
जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाउन कालावधीत व्यापार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. व्यापाराला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने व्यापार्‍यांना मदत करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने पालिका, जिल्हा परिषद, सहकारी संस्था, बाजार समितीच्या गाळेधारक व्यापार्‍यांचे एक वर्षाचे गाळाभाडे, वीजबिल, व्यवसाय कर माफ करावा, एन सणासुदी व लग्नसराईच्या काळात व्यवसाय बंद असल्याने व्यापारी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाहीत. त्यामुळे या काळातील व्याज माफ करावे, सवलतीच्या दरात नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, थकीत कर्जहप्ते पुढील वर्षात भरण्याची मुभा द्यावी, जीएसटी अदा करण्याची मुदत सहा महिने पुढे ढकलावी, गरजवंत व्यापार्‍यास तारणावर, बँक हमीशिवाय आवश्यक पतपुरवठा करण्यात यावा, निती आयोगाने जिल्ह्यास मागास जिल्हा म्हणून घोषित केले आहे, या जिल्ह्यातील व्यापार उदिम मर्यादीत आहे. त्यामुळे सर्व व्यापार्‍यांनी खास बाब म्हणून अल्पदरात कर्जाचा पुरवठा करण्यात यावा व उद्योगांचे अनुदान वाढविण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील विविध प्रकल्प, योजना यांचे काम त्वरीत करण्यात यावे, त्यामुळे बांधकाम व्यवसायाला गती येऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा, त्याचबरोबर जिल्ह्यासाठी उद्योगवाहिनी ठरणार्‍या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचे काम त्वरीत सुरू करावे, अशी महत्वपूर्ण मागणीही मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 
जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देतेवेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव लक्ष्मीकांत जाधव, उपाध्यक्ष संजय मोदाणी, धनंजय जेवळेकर, मुरली चांडक, सराव, गुळवे आदी उपस्थित होते. 
 
Top