उस्मानाबाद (प्रतिनिधी)  -
  कोरोना या विषाणूंचा संसर्ग किंवा गावात शिरकाव होऊ नये यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. गावकऱ्यांनी आपली व आपल्या गावची दक्षता घ्यावी यासाठी झरेगाव येथे कोरोना दक्षता समितीचे गठण करण्यात आले आहे.
सर्वत्र कोरोना विषाणूंच्या महामारीने धुमाकूळ घातला असून त्या विषाणूंचा फैलाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेकांच्या स्थलांतरावर आपोआप गडांतर आले आहे. तरी देखील काही मंडळी  एका गावाहून दुसऱ्या गावाला जाऊन या विषाणूंचा प्रसार व फैलाव करीत आहेत. त्यास रोखण्यासाठी गावस्तरावर समित्या गठीत करण्यात येत असून उस्मानाबाद तालुक्यातील झरेगाव येथे कोरोना दक्षता समितीचे गठण उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि दत्तात्रय सुरवसे , पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य उषा सोनवणे यांच्या उपस्थित करण्यात आले.
या समितीत अरुण सारफळे , दत्तात्रय सोनवणे , अमोल देशपांडे , विजय तांबे , अनिकेत ढोकळे , प्रकाश सोनवणे , ओम ढोकळे , धनाजी सोनवणे व रामचंद्र ढोकळे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदरील समितीचे सदस्य घरोघरी जाऊन कोरोना विषयी जनजागृती करीत असून कोणास सर्दी , खोकला किंवा ताप आदी लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून योग्य ते उपचार करण्यासाठी अवगत करीत आहेत. त्याबरोबरच परगावहून एखादी व्यक्ती गावात आल्यास त्या व्यक्तीची सर्व माहिती  पोलिस प्रशासनाला देऊन योग्य ती दक्षता घेण्याचे काम या समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
 
Top