उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 महाराष्ट्र शासनाने कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दि. 17 मे 2020 पर्यंत वाढविला आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.यातील मुद्या क्र.2 (i) नुसार ग्रीन,ऑरेज व रेड (हॉटस्पॉट) झोनबाबत स्पष्टीकरण करण्यात आले आहे.तसेच मुद्या क्र.2 (ii) नुसार कोरोना (कोव्हिड 19) चा प्रादूर्भाव विचारात घेऊन जिल्ह्यातील रेड झोन(हॉटस्पॉट) व ऑरेज झोनचा भाग निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चे रुग्ण आढळून आलेले असल्यामुळे कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कळंब तालुक्यात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनाचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दुरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, अन्न,भाजीपाला, दुध आणि किराणा पुरवणाऱ्या आस्थापना (सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरु राहतील) .दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विद्यूत पुरवठा,ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने,प्रसारमाध्यमे, मिडीया तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी.आस्थापना सुरु राहतील.
वरील आस्थापना व दुकाने वगळून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सर्व आस्थापना व दुकाने दि.17 मे, 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद, पोलीस अधीक्षक,उस्मानाबाद, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क,उस्मानाबाद ,उपविभागीय अधिकारी, कळंब व सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद, जिल्हा प्रशासन अधिकारी,नगर पालिका   प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद, तहसीलदार कळंब,गटविकास अधिकारी पंचायत समिती कळंब, तालुका आरोग्य अधिकारी कळंब, मुख्याधिकारी नगर परिषद कळंब, तसेच कळंब तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी इत्यादीची असेल.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच “महाराष्ट कोव्हिड 19 उपाययोजना नियम 2020” चे नियम क्रमांक 11 नुसार भारतीय दंडसंहिता (45/1860)कलम 188 मधील तरतुदी नुसार दंडनीय, कायदेशीरकारवाईस पात्र राहील. या आदेशाची अंमलबजावणी दि. 14 मे 2020 पासून तात्काळ लागु करण्यात येत आहे.
 
Top