उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या उस्मानाबादेत कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी उस्मानाबाद पालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दि.१ मे पासून संपूर्ण शहरात घरोघरी जाऊन नागरिकांची इन्फ्रारेड थर्मामीटरने तपासणी केली जात आहे. यानुसार, दि.१२ मेअखेर पालिकेच्या दहा पथकांनी ३१ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण केली आहे.
लॉकडाऊन व सीमाबंदी असतानाही जिल्ह्यात तसेच शहरातही काेरोनाबाधीत जिल्ह्यातून नागरिक दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर उस्मानाबादेत कोरोनाचा प्रवेश होऊ नये याकरीता उस्मानाबाद नगरपालिकेने २० इन्फ्रारेड थर्मामीटर घेऊन घरोघरी जाऊन नागरिकांच्या तपासणीचा निर्णय घेतला. यासाठी एक शिक्षक व आशा स्वयंसेविका असे दोघांचे दहा पथके तयार करून ही तपासणी सुरू केली. त्यानुसार दि.१२ मे अखेर या पथकांनी ३१ हजार नागरिकांची थर्मामीटरने तपासणी करून ज्यांना तापेसह सर्दी, खोकला, घश्यात दुखणे अशी लक्षणे आढळली त्यांची माहीती पालिकेच्या नागरि आरोग्य दवाखान्याकडे पाठविले आहेत.
 
Top