उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 कोरोना च्या संकटात कसलाही आधार न देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या निष्क्रिय धोरणाला कंटाळून शहरात भुकेने किंवा लाचारीने मरण्यापेक्षा आपल्या गावात जाऊन मरू असे ठरवूनच मजुरांनी स्थलांतर केले असल्याचे स्पष्ट मत जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या कित्येक दिवसापासून श्रमिक व कष्टकरी मजूर रस्त्यावर आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याच्याची कसलीही व्यवस्था न करता फक्त माध्यमांसमोर येऊन एकमेकाविरुद्ध गरळ ओकण्याचे काम सरकार करत आहे .शहरावर संकट आलंय म्हणून मजूर गावाकडे धावत सुटले नाहीत तर उद्योगधंदे बंद पडल्यामुळे व सरकारचे कसलेही आश्वासक धोरण नसल्यामुळे उपासमारीच्या भीतीने ते आपले गाव जवळ करत आहेत .केंद्र व राज्य सरकार  एकमेकांवर जबाबदारी ढकलून कष्टकरी मजुरांना वाऱ्यावर सोडले जात आहे. अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत न केल्यामुळे  कष्टकरी कामगारांची उपासमार झाली परंतु महाराष्ट्र सरकार खोटे बोल पण रेटून बोल या उक्तीप्रमाणे गोरगरीब व मजुरांची जबाबदारी झटकून टाकण्यातच धन्यता मानत आहे. स्थलांतरित मजूर, फेरीवाले व अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी सरकारने काही मदतीचा हात  दिला असता तर अशा जिवावर उदार होऊन मजुरांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या गावाकडे स्थलांतरित झाल्या नसत्या, तसेच मजुरांना जेवण खान आणि व्यवस्थेसाठी सरकारने उपाययोजना करणे गरजेचे होते. सर्व स्थलांतरित मजुरांना कोणत्याही रेशन दुकानातून मोफत अन्नधान्य दिले असते तर मजुरांना आपल्या गावाकडे जाण्याची काही आवश्यकता नव्हती. मुंबईत काम करणारे कित्येक मजूर एका खोलीत 10 जणांच्या ग्रुपने राहत असून जेलमध्ये तरी पाय मोकळे करायला जागा मिळते परंतु येथे तसे नाही .अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार मजूरा बरोबर माणुसकीहिन वागत आहे .मात्र सत्ताधारी व विरोधक दोघेही मजुरांच्या प्रश्नावर बासकळ बडबड करत आहेत. कष्टकरी कामगारांनी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ आर्थिक रोजगारविना, कुटुंबाच्या आरोग्याचा चिंतेत दिवस काढले आहेत ,आता महाराष्ट्र सरकारने तर मजुरांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आपापल्या गावी महामार्गावरुन पायी चालत जाताना रस्त्यात अनेक दानशूर लोक भेटतात व जेवणाचे पाकीट देत आहेत ,त्यामुळे कष्टकरी कामगार व मजुरांची हेळसांड करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा भोसले यांनी निषेध केला आहे.
 
Top