उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील नागरिक परराज्यात अडकून पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नांतून अनेकांना महाराष्ट्रात आणण्यात यश आले असून इतरांना परत आणण्यासाठी पाठपुरावा चालू आहे. अशाच गुजरातमध्ये अडकलेल्या मराठी मुली खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकाराने व प्रयत्नांमुळे आपापल्या घरी सुखरुप परतल्या आहेत.
 गडचिरोली व  भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर व साकोली तालुक्यातील 33 मुली कौशल्य विकास कार्यक्रमासाठी वापी व सुरत येथे गेल्या होत्या. परंतु लॉकडाऊनमुळे या मुली तिथेच अडकून पडल्या. या मुलींनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्याशी संपर्क साधला. सक्षणा सलगर यांनी याबाबतची माहिती खा. सुप्रियाताई सुळे यांना दिली. अशा कठीण परिस्थितीत परराज्यात अडकलेल्या मुलींना महाराष्ट्रात आणण्यासाठी सुप्रियाताईंनी तातडीने गुजरात प्रशासनाशी संपर्क साधून पाठपुरावा केला. मुलींना मानसिक आधार देण्यासाठी राष्ट्रवादी सक्षणा सलगर या मुलींच्या सतत संपर्कात होत्या. अखेर सुप्रियाताईंच्या प्रयत्नांमुळे या मुलींना सुखरुप महाराष्ट्रात परत आणण्यात यश आले. या मुलींना त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला व भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी एम. जी. प्रदीपचंद्रन , उपजिल्हा अधिकारी कल्पना नील,  यांनी सहकार्य केले. परराज्यात अडकलेल्या लेकी घरी आल्याने त्यांच्या पालकांनी खा. सुप्रियाताई सुळे यांचे आभार मानले.

 
Top