नळदुर्ग प्रतिनिधी:
 शहर व परिसरातील ग्रामीण भागात सायाळ व डुकरांकडून शेतकऱ्यांच्या उसाच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान केले जात आसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. दरम्यान सायाळ व डुकरांचा कसा बंदोबस्त करायचा हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे, सायाळ व डुकरांचा बंदोबस्त नाही झाला तर एकरी दहा ते बारा टन उसाचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान भूईमुगाची ही अशीच परिस्थीती आसल्याने डुकरांच्या आणि सायाळ यांच्याकडून शेतातील पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.
नळदुर्ग व परिसरातील ग्रामीण भागातील शेतामध्ये सध्या मोठया प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले आहे, नव्याने शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात खर्च करुन उसाची लागवड केली आहे, कारण शेतकऱ्यांना एकरक्कमी पैसा देणारे पिक म्हणजे उस आणि या उसामुळे शेतकऱ्यांना चांगला अर्थीक दिलासा मिळतो त्यामुळे शहर व परिसरातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात उसाची लागवड केली आहे. गेल्या वर्षी पावसाळा चांगला झाला आसल्याने सध्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे म्हणून उसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थीक फायदा करुन देणारे उसाचे पिक आसल्याने प्रामुख्याने तुळजापूर तालुक्यात शेतकऱ्यांचे मुख्य पिक उसच आहे. मोठया प्रमाणात खते आणि पैसा खर्च करुन शेतकऱ्यांनी उसाचे डौलदार पिक आणले आहे, प्रत्येक शेतकऱ्यांचे उसाचे पिक सध्या उन्हाळयात शेतातमध्ये नाचत आसतानाच सायाळ व डुकरांच्या सुळसुळाटात हे उसाचे पिक सापडले आहे. सध्या सगळयाच शेतकऱ्यांच्या उसाच्या पिकात रात्रीच्या वेळी सायाळ व डुकरांचा वावर वाढला आहे, रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणात उभे उसाचे पिक सायाळ व डुकरांकडून कुरतुडून टाकले जात आहे, एक एकर किंवा दोन एकराच्या फडातून दररोज शेतकरी सकाळी एक एक बैलगाडी एवढे उसाचे कुरतडलेले पिक फडाबाहेर काढत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे उसाचे पिक येणार की नाही अशी आवस्था आता निर्माण झाली आहे. प्रत्येक गावात व शहराच्या मैलारपूर परिसरात, चिंकुद्रा परिसरात मोठया प्रमाणात सायाळ व डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. दिवसभर शेतात काम करुन शेतकरी घरी जावून थोडा आराम करावा म्हटले तर शेतकऱ्यांना जमत नाही कारण त्यांना धास्ती आहे ती शेतात रात्रीच्या वेळी उभ्या उसाच्या फडात डुकरांकडून तोडले जाणारे उसाचे पिक त्यामुळे रात्रीच्या वेळी पुन्हा शेतकरी उसाची राखण करण्यासाठी शेतावर जात आहे परंतु शेतकरी किती वेळ जागरण करणार, कारण थोडी ही झोप शेतकऱ्यांना लागली की सायाळ आणि डुकरांकडून उभे उसाचे पिक मोडले जात आहे त्यामुळे शेतकरी या सायाळ व  डुकरांच्या त्रासापासून पुरता वैतागला आहे. उसाचे पिक कसे आणायचे हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर आहे. कारण दररोज मोठया प्रमाणात डुकर आणि सायाळ यांनी उसाचे पिक कुरतडुन टाकल्याने ते फडाबाहेर काढावे लागत आहे. या शिवाय भुईमुगाचे पिक ही अशाच्या संकटात सापडले आहे. भूईमुगाचे सायाळ व डुकरांकडून मोठया प्रमाणात नुकसान केले जात आहे. रात्रीच्या वेळी सायाळ व डुकरांकडून भूईमुग ही उपडून टाकले जात आहे त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
 
Top