लोहारा/प्रतिनिधी-
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.30) लोहारा ग्रामीण रूग्णालयास भेट देऊन तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच याठिकाणी लागणार्‍या आवश्यक त्या सोई-सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधीत अधिकार्‍यांना दिल्या.
आ.सतीश चव्हाण यांनी लोहारा ग्रामीण रूग्णालयाची पाहणी करून याठिकाणी कोण कोणत्या वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे, सध्या तातडीने कोण कोणत्या वस्तुंची गरज आहे, कर्मचार्‍यांची सं‘या पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का?, कर्मचार्‍यांना काम करताना कोणत्या अडचणी येत आहेत का?, एन-95 मास्क व पीपीई कीट उपलब्ध आहेत का? आदीसंदर्भात आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद साठे यांच्याशी चर्चा केली. यावेळी याठिकाणी अनेक आवश्यक वस्तूंचा तुटवडा असल्याचे आ.सतीश चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजकुमार गलांडे यांच्याशी फोनव्दारे चर्चा करून लोहारा ग्रामीण रूग्णालयास अत्यावश्यक वस्तूंची तात्काळ पूर्तता करण्याची मागणी केली. तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड महिन्यांपासून क्वारंटाईन केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी देखील आ.सतीश चव्हाण यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी नायब तहसीलदार रणजित शिराळकर, लोहरा नगर पंचायतचे मुख्य  कार्यकारी अधिकारी गजानन शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद साठे, सतीश इंगळे, नितीन बागवे, प्राचार्य डॉ.विरभद्रेश्वर स्वामी आदींची उपस्थिती होती.
 
Top