उस्मानाबाद/प्रतिनीधी
 जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डामध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा बाथरुममध्ये मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली आहे. नेमका कोणत्या कारणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, हे समजू शकले नाही; मात्र बाथरुममध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाला असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उस्मानाबाद शहरातील विकासनगर भागातील एकाला कोरोनाची लक्षणे आढळल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षामध्ये संबंधितावर उपचार सुरु होते.
 आज सकाळी सदर व्यक्ती बाथरुममध्ये गेली; मात्र बराच वेळ होऊनही तो परत आला नाही. हे निदर्शनास आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत संबंधितास आवाज दिला; परंतु कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाला माहिती देण्यात आली. या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर रुग्णालयातील कर्मचाऱ्‍यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रुग्ण खाली पडलेल्या अवस्थेत आढळला. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. मात्र नेमका कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला, याचा उलगडा होउ शकला नाही.
 कोरोना वॉर्डातील रुग्ण असल्याने तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. या रुग्णाचा अहवाल आज येणे अपेक्षित असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. कोरोना वॉर्डात उपचार सुरु असलेल्या संशयित दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
यापूर्वी ही कोरोना वॉर्डात उपचार सुरु असलेल्या संशयित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे; मात्र दोघांचाही मृत्यू कोरोनाने नव्हे, तर अन्य आजाराने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही अन्य आजाराने त्रस्त होते. दरम्यान, आज मृतावस्थेत आढळलेल्या रुग्णाच्या स्वॅबचा अहवालही आज रात्रीपर्यंत मिळणार आहे.
 
Top