उस्मानाबाद/प्रतिनिधी - 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी लागू केल्यानंतर स्थलांतरित व रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे काय होईल याचा विचार केंद्र व राज्य सरकारने केला नसल्यामुळेच उपासमारीच्या भीतीपोटी आपले गाठोडे डोक्यावर उचलून स्त्यावर चालणा-या मजुरांच्या प्रश्नाचे थोडेही गांभीर्य महाराष्ट्र शासनाने घेतलेले नाही. आपले मुख्यमंत्रिपद जाते की राहते यासाठी दररोज राज्यपालांच्या दारात खेटे मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी मजुरांची काळजी न घेतल्यामुळेच औरंगाबाद येथील रेल्वे दुर्घटना घडून त्यामध्ये 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात आहे .कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरले आहेत असा आरोप जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केला आहे.
औरंगाबाद जवळचे अपघाता पूर्वी टाळेबंदी मुळे 356 जण मृत्यू पावले असून यापैकी सर्वाधिक रुग्ण संख्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या शंकेने आत्महत्या करणार्‍यांचे आहे. अन्य देशात अडकलेल्या साठी विमाने ,नौदलाच्या बोटींची व्यवस्था तर आपल्याच राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना रेल्वे रुळा खाली चिरडून मरण्याची वेळ येते आहे. दीड महिन्यानंतरही सरकारचा ठोस निर्णय होत नसल्याचे व कोरडा दिलासा देण्यापलीकडे काही होत नसल्याचे लक्षात येताच ग्रह मंत्री अनिल देशमुख यांचे लाठ्याकाठ्या ला तेल लावलेले पोलिस रस्त्यावर बघून मजुरांनी आपल्या संसाराचे ओझे डोक्यावर घेऊन सैरभैर पायीच दिसेल त्या आडमार्गाने गाव गाठण्याचा चंग बांधला. मजुरांचे तांडेच्या तांडे भर उन्हात पायपीट करत आपल्या गावी निघाल्याचे दिसत असतानाही त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मिळेल त्या रेल्वेने ,बस व खाजगी वाहनाने परप्रांतात राहणाऱ्या मतदार असणाऱ्या मजुरांना पैसे देऊन घेऊन येणाऱ्या सरकारमधील तथाकथित पुढाऱ्यांना आता टाळे बंदित उपासमारीने बेजार झालेले हजारो मजुरांचे तांडे राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावरून आपल्या डोक्‍यावर गाठोडे घेऊन गावाकडे निघालेले उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. चिरडलेल्या मजुरांचा बळी रेल्वेने नव्हे तर महाराष्ट्र सरकारच्या  गैर नियोजनामुळे झाला आहे ,यापुढेही लॉक डाऊन च्या कालावधीत हजारो मजूर व कामगारांचा बळी महाराष्ट्र सरकारच्या गलथान कारभारामुळे जाईल असे दिसते, तरी औरंगाबाद येथील रेल्वे रुळावर घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.
 
Top