उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी जिल्हयात मद्य विक्री बंदीचे  आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश ही त्यांनी दिले आहेत. परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गावात व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कारखाना परिसरात मोठया प्रमाणात अवैध मार्गाने दारूची विक्री होत आहे. परंतु याकडे बेंबळी पोलिसांचे का दुर्लक्ष होत आहे? हा प्रश्न मनाला भेडसावणारा आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करत सुरू असणारी अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने तालुका अध्यक्ष नंदकुमार मनाळे यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील बेंबळी गांवात  व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने देशी दारु, हातभट्टी व गावठी प्रकारची दारु मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. तसेच बेंबळी गावात ही मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री  होत असल्याने आसपासच्या परिसरातील अनेक दारु पिणारे दारूडे येथे दारु मिळत असल्यामुळे व दारु पिण्यासाठी ये-जा करत आहेत. याकडे बेंबळी पाेलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने या दारू विक्रेत्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळेच   दिवसेंदिवस दारू विक्रेत्यांची ताकद वाढत चालली आहे.  अवैध स्वरूपात विक्री होत असलेल्या ठिकाणी होत असलेल्या दारूड्यांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. याकडे बेंबळी पाेलिसांनी लक्ष देऊन अवैध दारू विक्री स्थळी तत्काळ कारवाई करून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर तालुका अध्यक्ष नंदकुमार मनाळे यांची स्वाक्षरी आहे.

 
Top