नळदुर्ग /प्रतिनिधी-
 नळदुर्ग येथील वीज वितरण कँपणीच्या कार्यालयातील ट्रान्सफॉर्मरला दि.९ मे रोजी आग लागली आग इतकी भिषण होती की आगीचे लोळ व धुराचे लोट लांब अंतरावरून दिसत होते. भर दुपारी कडक उन्हात आग लागल्याने क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. हा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नळदुर्ग शहरासह जवळपास ११ गावांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. या घटनेमुळे किमान आठ दिवस तरी वीजपुरवठा सुरू होण्याची शक्यता नाही.
नळदुर्ग येथे विजवितरण कंपनीचे कार्यालय आहे या कार्यालयातुन नळदुर्ग शहरासह ११ गावाला वीज पुरवठा होतो. दि.९ मे रोजी या कार्यालयातील ट्रान्सफॉर्मरला आग लागली. कडक उन्ह व वाऱ्यामुळे आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. या ट्रान्सफॉर्मरमध्ये जवळपास ३ हजार ५०० लीटर ऑइल असल्याने तसेच वायरिंग असल्याने क्षणात आगीने रौद्र रूप धारण करून या ट्रान्सफॉर्मरसह इतर ट्रान्सफॉर्मर तसेच कार्यालयालाही आगीने आपल्या कवेत घेतले. आग लागण्यापुर्वी याठिकाणी मोठा आवाज झाला त्यानंतर आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर प्रचंड मोठया प्रमाणात आगीचे लोळ व धुराचे लोट आकाशात लोटले. जवळपास १ ते २ किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ व धुराचे लोट दिसत होते. नळदुर्ग न.प.ची अग्निशमन गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली व आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वारे सुटल्याने व ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑइल असल्याने आग भडकतच गेली. यावेळी नागरीकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी बघ्यांची गर्दी कमी केली त्यांनी कार्यालयामध्ये जमलेल्या नागरीकांना पिटाळून लावले. वीज वितरण कंपनीचे नळदुर्ग येथील अभियंता श्री गायकवाड व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग इतकी मोठी होती की या आगीपुढे कुणाचेच कांही चालले नाही. अग्निशमन दलाच्या एक गाडीने आग आटोक्यात येत नसल्याचे पाहुन तुळजापुर, मुरूम व उमरगा येथील न.प.च्या अग्निशमन च्या गाड्या मागविण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधला मात्र एकाही ठिकाणी अग्निशमन गाडी उपलब्ध होऊ शकली नाही.
या आगीमध्ये विजवितरण कंपनीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.नागरीक तसेच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील मीटर, कॉम्प्युटर व कागदपत्रे वेळीच बाहेर काढले त्यामुळे ते आगीपासुन बचावले. अन्यथा हेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते.हा ट्रान्सफॉर्मर 5MW अम्पियर क्षमतेचे असुन या ट्रान्सफॉर्मरमध्ये ३ हजार ५०० लीटर ऑइल होते. ट्रान्सफॉर्मर, केबल व इतर साहीत्य या आगीत जळुन खाक झाल्याने जवळपास ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे नळदुर्ग, जळकोट, अलियाबाद,रामतीर्थ, येडोळा,वागदरी, मानेवाडी, तसेच नळदुर्ग व तुळजापुरच्या पाणी पुरवठ्याची वीज खंडित झाली आहे.

 
Top