उस्मानाबादध/ प्रतिनिधी   -
 जिल्ह्यात पर्जन्यमानुसार पाऊस होत नसल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होते व पिकास पाणी न मिळाल्यामुळे पिके करपून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी जास्त पाणी घेणारी व लागणारी उसासारखी पिके घेण्याऐवजी  हळद , अद्रक व सोयाबीन यासारखी नगदी पिके घ्यावीत असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले.
लोहारा तालुक्यातील आष्टा ( का ) येथे खरीप हंगाम पेरणीसाठी बियाणांची उगवणशक्ती चांगली आहे का नाही ? हे तपासून पाहण्यासाठी आवश्यक असणारी  उगवणशक्ती व बीज प्रक्रिया कशी केली जाते ? याचे प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या माध्यमातून घेण्यात आले. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी बिडबाग बोलत होते.
यावेळी कृषी सहाय्यक एस. एच. पवार , सरपंच सुनिल सुलतानपुरे , मुकेश मुळे , विवेक सोमवंशी , रवी शिदोरे , प्रविण चिंचनसुरे ,  बालाजी कोरे , व्यंकट चौधरी व कृषीमित्र पिंटू मदने आदी उपस्थित होते.
सोयाबीन पीक शेतीशाळा , माती परीक्षण  व खत  व्यवस्थापन या विषयावर बोलताना ते म्हणाले की सोयाबीन पिकासाठी रुंद सरी-वरंबा पेरणी पद्धत महत्त्वाची असून पाण्याचे महत्त्व व स्वसंरक्षित सिंचनाचा वापर करणे काळाची गरज आहे. त्यासाठी उसाचे क्षेत्र कमी करून त्याऐवजी हळद , अद्रक व सोयाबीन यासारखी नगदी पिके घ्यावीत व फळबाग क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना शेती व उत्पादन या विषयी  सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंग ठेवून व तोंडास मास्कचा वापर करून यशस्वीरित्या पार पडला.
 
Top