महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे संकट निवारण्यासाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस,आरोग्य, महसूल कर्मचारी यांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे तो स्वागतर्ह आहे.मात्र यांना सहाय्यभूत ठरणारे प्रत्येक गावचे सरपंच व उपसरपंच यांचा देखील महाराष्ट्र शासनातर्फे ५० लाख रुपयांचा विमा उतरवावा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित दादा पवार यांना ई-मेल द्वारे दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,सध्या कोरोनाव्हायरसचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस,आरोग्य, महसूल कर्मचारी हे सरकारी कर्मचारी आहेत व त्यांना महाराष्ट्र शासनाने विम्याचे कवच दिले आहे.परंतू सरपंच उपसरपंच यांना गावात दररोज फिरावे लागत आहे त्यातच बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तींशी सरपंच उपसरपंच यांचा संपर्क येतो. त्यामुळे त्यांच्यात जीवाला देखील धोका आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे सरपंच-उपसरपंच यांना 50 लाख रुपये विम्याचे कवच देण्यात यावे.अशा आशयाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवारसाहेब,ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांनाही ईमेल केल्या आहेत.