उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तुळजाभवानी देवीचे पुजारी महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्यासह ७ जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महंत तुकोजी बुवा यांचा वाढदिवस साजरा करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत मास्क न घालणे यासह इतर कारणामुळे हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महंत तुकोजी बुवा यांचा १० एप्रिल रोजी वाढदिवस होता . वाढदिवस साजरा करताना केक कापण्यात आला यावेळी महंत वाकोजीबुवा, ऍड संजय पवार, तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी व इतर ३ जणांनी तोंडाला कोणत्याही प्रकारचे मास्क वापरले नाहीत शिवाय सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन न करता बेकायदेशीरपणे जमाव जमविला. वाढदिवसाचा ११ सेकंदचा विडिओ तयार करून सोशल मीडियावर पसरविण्यात आला तसेच तो सुरज जगताप या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून अपलोड करण्यात आला.
पोलिसांनी या विडिओच्या आधारे या सर्व व्यक्ती विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे कलम १८८,२६९ व महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम २०२० कलम ११ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी सर्वानी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे शिवाय दोन व्यक्तीमध्ये १ मीटरचे अंतर राखणे आवश्यक आहे तसेच पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई आहे. उस्मानाबाद जिल्हा मास्क न घालणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी वावर करण्याऱ्या शेकडो जणाविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.
 
Top