लोहारा/प्रतिनिधी
संपूर्ण जग आज कोरोना विषाणूमुळे संकटात आहे. या जागतिक महामारीमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. आपल्या देशात ३० जानेवारीला केरळ राज्यात पहिला रुग्ण आढळला आणि मग हळूहळू सर्व देशात कोरोना पसरत गेला. आज देशात सतरा हजारच्या वर कोरोना बाधित रुग्ण तर आपल्या राज्यात ४६०० कोरोना बाधित रुग्ण आहेत. अशी स्थिती म्हणजे ‘सगळीच वादळं काही तुमचे आयुष्य उध्वस्त करायला येत नाहीत तर त्यातील काही तुमचा रस्ता मोकळा करण्यासाठी पण येतात. ‘हे आपण लक्षात घेतले पाहिजे. उस्मानाबाद जिल्ह्यात तीन कोरोना बाधित रुग्ण पॉजिटिव्ह आढळले होते, सुदैवाने ते तिन्ही रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्हा आता ग्रीनझोन मध्ये आल्याचे बसवराज पाटील यांनी  सांगितले.
 पुढे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, सर्वांनी कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाचा फैलाव होऊन नये म्हणून केंद्र व राज्य सरकार शर्तीचे प्रयत्न करीत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा,पोलीस यंत्रणा, सफाई कर्मचारी आदी अतिशय तत्परतेने व जबाबदारीने सेवा देत आहेत. यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर पदाधिकारी, कार्यकर्ते गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्य सरकारही धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करून सर्व प्रकारच्या सेवा - सुविधा पुरवित आहेत.आज घडीला राज्यासमोर फार मोठे आर्थिक संकट आले आहे.कारण एका बाजूला कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने सर्व उद्योगधंदे, व्यापार, माल वाहतूक, बाजारपेठा बंद तर दुसऱ्या बाजूला लॉकडाऊनमुळे देशावर आर्थिक संकट आले आहे. या जागतिक महामारीला सामोरे जात असताना अनेक चांगले निर्णय व उपाययोजना तत्परतेने घेतल्या जात आहेत. राज्यातील जनता देखील याकामी सरकारला सहकार्य करीत आहे. देशावर आर्थिक मंदीची लाट असताना सुद्धा सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते अगदी उत्स्फूर्तपणे जनतेला मदत करीत आहेत. या कोरोना विषाणूचा मुकाबला करावयाचा असेल तर सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे. आपला देश म्हणजे विविधतेत एकता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, बंधूभाव आणि सामाजिक बांधीलकी ही मूल्य घेऊन जगात महासत्ता होण्यासाठी धडपडतो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येऊन गरजूंना मदत करू या. आपण सर्वजण घरात बसूनच सोशल डिस्टन्सिंग, शँनिटायझर, मास्क व इतर आरोग्यविषयक बाबींची काळजी घेऊन सुरक्षित अंतर ठेवून स्वतःसोबत आपल्या कुटुंबाची व इतरांची देखील काळजी घेवू या.केंद्र व राज्यसरकार, आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर व तंतोतंतपणे पालन सर्वांनी करावे. देशाला कोरोना मुक्त करायचे असेल, तर सर्वांनी एकत्रित येऊन हा लढा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ज्यांना जे-जे शक्य आहे,ते ते  सहकार्य करावे. चिंता करून हा प्रश्न सुटणारा नाही. याकरिता प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. काळ बदलला आहे,परिस्थिती कठीण आहे परंतु अशा कठीण काळातच खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान, जबाबदारीने वागणाऱ्या माणसाची देशाला गरज आहे.संकटात धैर्य,प्रगतीत निगर्वीपणा, सभेत वक्तृत्व कुशलता, युध्दात पराक्रम तर कोरोनासाठी स्वतःची सुरक्षितता महत्वाची आहे. परिस्थितीदेखील अडचणीची असली तरी यावरती सर्वांनी चिंतन करणे गरजेचे आहे.डॉक्टर, नर्सेस, पोलीस यंत्रणा, सफाई कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस तत्परतेने सेवा देत आहेत. त्यांचे मनोबल आपण सर्वांनी मिळून वाढवू या. या काळात बसवराज पाटील यांनी अनेकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्याशी संवाद साधून धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. दरम्यान पक्षातील युवक कार्यकर्त्यांना कामाच्या नियोजन बाबतही चर्चा यावेळी करण्यात आली. सध्या तरी अजून या कोरोना विषाणूवर खात्रीशीर लस, औषध उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे याला रोखण्यासाठी एकच पर्याय तो म्हणजे घरीच रहा, सुरक्षित रहा, निराशेत न राहता धाडसाने सामना करा.कुठल्याही अफवानवर विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः जगा आणि इतरांनाही जगू द्या! या तत्त्वाप्रमाणे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून कोरोनाला देशातून हद्दपार करू या! असा संदेश ही शेवटी प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिला.

 
Top